3 लाख 73 हजार वाहनांची विक्री : मारुतीच अव्वल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये फेब्रुवारीमध्ये समाधानकारक वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 लाख 73 हजार 177 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 11 टक्के वाढ नोंदली गेली आहे.
एसयूव्ही गटातील कार्सच्या मागणीला दमदार प्रतिसाद ग्राहकांकडून प्राप्त झाला आहे. या तुलनेमध्ये सदरच्या गटातील वाहनांच्या वितरणामध्येदेखील सक्रियता राहिल्याने प्रवासी वाहनांची विक्री फेब्रुवारीमध्ये दमदार राहिली असल्याचे पाहायला मिळाले आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 3 लाख 35 हजार 324 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये 3,94,571 प्रवासी वाहनांची विक्री नोंदली गेलीय. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 3 लाख 91 हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. या तुलनेमध्ये पाहता फेब्रुवारीमध्ये झालेली वाहन विक्री ही सर्वाधिक मानली जात आहे.
एसयुव्ही कार्सचा वाटा सर्वाधिक
फेब्रुवारीमध्ये झालेल्या एकूण विक्रीमध्ये एसयुव्ही गटातील कार्सचे योगदान 51 टक्के राहिले आहे. सकारात्मक आर्थिक वृद्धी हे कार विक्री वाढीचे कारण सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार वाहनांचे तत्पर वितरणदेखील केले जात असल्याने वाहन विक्री वाढीला या धोरणाचा लाभ उठवता आला आहे. एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत 38 लाख वाहनांची विक्री झाली आहे तर मागच्या वर्षी हाच आकडा 35 लाख इतका होता. म्हणजेच वाहनांच्या मागणीमध्ये नऊ टक्के वाढ दर्शवली गेली आहे. यामध्ये मारुती सुझुकी ही कंपनी 16 लाख वाहनांच्या विक्रीसह आघाडीवर राहिली आहे.
टोयोटाने विकल्या 25 हजारहून अधिक गाड्या
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटाने फेब्रुवारी महिन्यामध्ये 25 हजार 220 वाहनांची विक्री करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंतच्या महिन्यातील कार विक्रीचा विचार करता सर्वाधिक विक्रीची नोंद मागच्या महिन्यात केली असल्याचे सांगितले जात आहे. टोयोटा कंपनीने 23 हजार 300 वाहनांची विक्री देशांतर्गत पातळीवर केली असून 1 हजार 920 वाहनांची निर्यात केली आहे. मागच्या वर्षी समान महिन्यात कंपनीने 15,685 वाहनांची विक्री केली होती.
दुसरीकडे आणखीन एक ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी मागच्या फेब्रुवारी महिन्यात विक्रीमध्ये 24 टक्के वाढ नोंदवली. 72,923 वाहनांची विक्री महिंद्राने मागच्या महिन्यात केल्याची नोंद आहे. एक वर्ष आधी फेब्रुवारी महिन्यात 58,801 वाहनांची विक्री कंपनीने केली होती. त्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 40 टक्के वाढ नोंदवली गेलीय. म्हणजेच या गटातील वाहनांची विक्रीची संख्या 42 हजार 41 इतकी राहिली आहे. दुसरीकडे 21 हजार 672 ट्रॅक्टरची विक्री कंपनीने मागच्या महिन्यात केली आहे.
फेब्रुवारीतली कंपन्यांची कामगिरी
मारुती सुझुकीने फेब्रुवारी महिन्यात 1 लाख 60 हजार 271 वाहनांची विक्री केली आहे. ह्युंडाई मोटरने सदरच्या महिन्यामध्ये 50 हजार 201 वाहनांची देशांतर्गत विक्री केली आहे. जानेवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या क्रेटा या वाहनाची विक्री फेब्रुवारीमध्ये 15 हजार 276 इतकी राहिली आहे. 2015 मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेल्या क्रेटाची फेब्रुवारी महिन्यातील विक्री ही सर्वाधिक मासिक विक्री मानली जात आहे. टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्यात 51,267 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता विक्रीत 20 टक्के वाढ नोंदलेली आहे.









