वाहन चालकांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
ओटवणे | प्रतिनिधी
तांबुळी – असनिये या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याबाबत असनिये येथील विलास उर्फ विद्या सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधताच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहन चालकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तांबुळी – असनिये हा मुख्य रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असुन हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. मूळात हा रस्ता अरुंद असून त्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अनेकवेळा या रस्त्यावर लहानसहान अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर विलास उर्फ विद्या सावंत आणि केसरी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाला याचा जाब विचारला. त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी त्वरीत तोडण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडण्यास प्रारंभ झाला असून या मार्गावरील वाहन चालकांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.









