ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांचे गौरवोद्गार, अॅड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव उत्साहात
बेळगाव : अर्धशतकापेक्षा अधिक काळ एका विचाराशी निष्ठावंत असणारे अॅड. नागेश सातेरी यांनी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या राजकीय आयुष्यात कोणत्याही आमिषाला आणि दडपणाला बळी न पडता वाटचाल केली आहे. कामगार चळवळ, सीमाप्रश्न, सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सातारा येथील लेखक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी काढले. कामगार नेते, माजी महापौर अॅड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सवी सोहळा रविवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. कृष्णा मेणसे होते. व्यासपीठावर ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, प्रा. आनंद मेणसे, डॉ. सिद्दनगौडा पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी, प्रसन्ना उटगी, कला सातेरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी सहदेव कांबळे यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अॅड. नागेश सातेरी यांचा फेटा आणि फळांची करंडी व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी कला सातेरी यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, जी. बी. कुलकर्णी, प्रा. शिला मेणसे, सिद्दनगौडा पाटील, सिद्दगौडा मोदगी, प्रभू यत्नट्टी आदी मान्यवरांनी नागेश सातेरी यांच्या जीवनकार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला. यावेळी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर म्हणाले, अॅड. नागेश सातेरी यांनी आपल्या कर्तबगारीवर ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कृष्णा मेणसे यांच्या प्रभावाने कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले. महापौरपदाच्या कार्यकाळात देखील अनेक विकासकामे राबविली. कामगार चळवळीचे नेतृत्व करताना सर्वसामान्यांसाठी ते झटले, हा आदर्श आहे. समाजकारणाबरोबर राजकारणात तरबेज असणारे सातेरी केवळ एकाच पक्षाशी एकनिष्ठ आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. अनिल आजगावकर व अशोक आलगोंडी यांनी सूत्रसंचालन केले तर कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले.









