दोडामार्ग – वार्ताहर
साटेली-भेडशी येथील प. पू. स. स. श्री राऊळ महाराज स्मारक मंदिरात सुर्यनमस्कार स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातील विविध स्पर्धकांनी भाग घेतला होता. बोडदे शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविले.मानवी जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. दैनंदिन योगाभ्यास केल्याने आपण अनेक रोगापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
मुलांना योगाभ्यासांची आवड निर्माण व्हावी म्हणून पतंजली संस्था, आर्ट ऑफ लिव्हिंग, सिद्ध समाधी योग अशा वेगवेगळ्या संस्थानी मिळून या सुर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले. नित्य दिव्य योगाश्रम, वेतोडा-गोवा, सद्गुरू समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्ट – पिंगुळी व योग संगम समिती साटेली-भेडशी यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्कार प्रचार संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात केला होता. या स्पर्धेत १५० हून अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ७ ते११, १२ ते १५, १६ ते २१ अशा तीन गटात घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक गटातून बोडदे शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. १२ ते १५ वयोगटात स्नेहा नारायणगवस व सोहम अंकुश सावंत यांनी प्रथम, प्रथमेश नवनाथ दळवी (उत्तेजनार्थ) तर ७ ते११ वयोगटातून दत्ताराम प्रविण गवस याने तृतीय क्रितीक नितेश पारधी व श्रावणी तुळशीदास गवस यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यशस्वी मुलांचे व त्यांचे प्रशिक्षक पुनम खोराटे व समीर घाडी यांचे कौतुक करण्यात आले.









