प्रतिनिधी,कोल्हापूर
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वांना पोटनियमांचे पत्र देण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सतेज पाटील गटाने पोटनियमांचा अभ्यास करणे गरजेचे होते. पोट नियमांचा ज्यांनी भंग केला आहे अशा उमेदवारी अर्जांवरच आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांचे 29 उमेदवार कायदेशीर मार्गानेच अपात्र ठरले आहेत. यावरून आमदार सतेज पाटील पोटनिमांचा अभ्यास करण्यात कुठेतरी कमी पडले असल्याचे दिसून येत आहे अशा शब्दात माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत टोला लगावला.
माजी आमदार महाडिक म्हणाले, महाडिक भ्याले, आता कंडका पाडायचा अशी वक्तव्ये करून आमदार सतेज पाटील सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाडिक हे घाबरणारे नाहीत तर लढणारे आहेत. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. निवडणुकीत हार-जीत होत असते, ती स्वीकारून पुढे जावे लागते. लोकशाही मार्गाने खेळीमेळीत ही निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र महाविकास आघाडी मधील नेत्यांना या निवडणुकीत उतरवत आमदार पाटील ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेऊन जात आहेत, असा आरोप महाडिक यांनी केला.
विरोधकांकडूनच सत्तेचा वापर
आमदार सतेज पाटीलच सत्तेचा वापर करून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांची सत्ता असणारा गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, डी. वाय. पाटील कारखाना, डी. वाय. पाटील उद्योग समूह यासह सत्ता असणाऱ्या अन्य सहकारी संस्थांमधील कर्मचारीही त्यांनी या निवडणुकीत प्रचारासाठी उतरवले असल्याची टीका महाडिक यांनी केली.
27 वर्षांपासूनच सभासदांच्या दारात
गेल्या 27 वर्षांपासूनच महाडिक राजाराम कारखान्यातील सभासदांच्या दारात जात आहेत. पण आमदार पाटीलच सभासदांच्या संपर्कात नसल्याने कदाचित त्यांना आम्ही आता सभासदांच्या दारात जाताना दिसत आहे, असे प्रत्युत्तर महाडिक यांनी दिले.
मग यांचे कुटुंबीय काय करत आहेत
महाडिकांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले आहेत असे विरोधक म्हणत आहेत. महाडिकांप्रमाणे आमदार सतेज पाटील यांचेही कुटुंब प्रचार करताना दिसत आहे. मग त्यांचे कुटुंब या निवडणुकीत नेमकं काय करत आहे याचे स्पष्टीकरण ही आमदार पाटील यांनी द्यावी असे आव्हान महाडिक यांनी केले.
रडीचा डाव विरोधकांनीच खेळला
राजाराम कारखान्याला गेली 41 वर्ष ऊस घालणाऱ्या 1899 सभासदांना अपात्र ठरवून आमदार सतेज पाटील यांनीच रडीचा डाव खेळला आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करून या सभासदांना न्याय देण्याचे काम महाडिक यांनी केले आहे. यामधून आमदार पाटील यांना सहकार चालवायचा आहे की मोडायचा आहे हे स्पष्ट होत असल्याचा आरोप महाडिक यांनी केला.
स्वाभिमानी होता तर राजीनामा का दिला नाही
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत असणारे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने हे सहकारातील देव चोरला असे म्हणत आहेत पण चार वेळा गट बदलूनही माजी आमदार महाडिक यांनी मोठे मन दाखवून माने यांना सोबत घेतले. पण आता ते स्वाभिमानाची भाषा करत आहेत. इतकेच स्वाभिमानी होता तर कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या चार पाच महिन्यात राजीनामा का दिला नाही असा प्रश्न महाडिक यांनी माने यांना केला.
जिह्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना करणार
येत्या वर्षभरात राजाराम कारखान्याचे पाच हजार क्रशिंग आणि 18 मेगा वॅटचे कोजनरेशन करणार आहे. पुढील काळात जिह्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून राजाराम कारखान्याची ओळख असेल असे माजी आमदार महाडिक म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









