कोल्हापूर :संतोष पाटील
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result News : विधानसभा, लोकसभा, गोकुळ, जिल्हापरिषद, जिल्हाबँक आदी सलग विजयामुळे ‘आमचं ठरलयं‘ तेच करुन दाखवणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना घेरण्यात महाडिक गट राजाराम कारखाना निवडणूक यशस्वी झाला. अतिसुक्ष्म नियोजन आणि राजकीय जोडण्या करत निवडणूक एका दिशेला नेण्यात सतेज पाटील यांचा हातखंडा होता. तशा जोडण्या करण्यात आपणही कमी नसल्याचे महाडिक गटाने राजारामच्या निकालातून दाखवून दिले. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि निवेदिता माने या भाजप मित्रपक्षाच्या शिलेदारांच्या साथीने महाडिक गटाने जिह्याच्या राजकारणात राजारामची सत्ता राखत जोरदार कमबॅक केले. राजारामच्या विजयी गुलालाने रिचार्ज झालेला महाडिक गटाचे यापुढे कडवे आव्हान सतेज पाटील गटापुढे असेल.
जिह्याच्या राजकारणातील महाडिक पॅटर्न मोडीत काढत आमचं ठरलय हे ब्रिदवाक्य रुजवण्यात मागील दहा वर्षात सतेज पाटील यांना कमालीचे यश आले होते. महाडिक विरोधकांची मोट बांधत महापालिका, जिल्हापरिषद, गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांनी सत्तांतर घडवून आणले. 2019च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अमल महाडिक आणि धनंजय महाडिक यांचा पराभावाचे निमित्त सतेज पाटील ठरले. राजाराम कारखाना या बावड्यातील आपल्या होमपिचवरुन महाडिक गटाची पिछेहाट करण्याचे सुक्ष्म नियोजन पाटील यांनी केले. 2009 साली महाडिक यांच्या विरोधात राजाराम कारखाना निवडणुकीत पहिल्यांदा रणशिंग फुंकले. महाडिकांनी ही निवडणूक सहज जिंकली. मात्र, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणतेही पद नसताना सतेज पाटील यांनी कडवी झुंज दिली. अवघ्या दीडशे ते दोनशे मतांनी निसटता पराभव झाला. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याची हवा तापती ठेवली. 1643 सभासद पहिल्यांदा सहकार विभागाने आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने अपात्र ठरविले. त्यामुळे राजारामची निवडणूक एकतर्फी होणार असा अंदाज वर्तवला गेला. मात्र, गोकुळनंतर सर्वच सत्ताकेंद्र सतेज पाटील यांच्या ताब्यात द्यायच्या नाहीत, ही भावना राजाराम निवडणुकीत प्रकर्षाने प्रभावी ठरली.
दरम्यान, राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर वर्णी लागली. सर्वोच्च न्यायालयाने 1643 अपात्र सभासदांबाबत सत्ताधारी आघाडीच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर महाडिक गटाने राजाराम निवडणुकीत सुक्ष्म नियोजन केले. सहकार कायद्याचा आधार घेत सतेज पाटील गटाचे तगडे 28 उमेदवार कायद्याच्या चौकटीत अपात्र ठरवत मोठा धक्का दिला. ऊस दरवाढ, को-जनरेशन प्लांट, कारखाना व्यवस्थापण आदींवरुन महाडिकांची कोंडी करणाऱ्या सतेज पाटील यांना डी.वाय. पाटील कारखाना सभासद मुद्यावरुन घेरले. भाजपची पक्षीय ताकद महाडिक गटाने उपयोगात आणली. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाला साद घालत आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, निवेदिता माने या शिलेदारांची यशस्वी मदत मिळवली. राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुका हा महत्वाचा गड मानला जातो. 2014च्या निवडणुकीत महाडिक गटाला येथून साडेतीनशे मताधिक्क होते. यंदाच्या निवडणुकीत हातकणंगलेतील आघाडी हजार मतांवर गेली. शिरोलीचा गड महाडिकांनी राखलाच उलट कसबा बावड्यातून तीनशेहून अधिक मते घेत, पाटील गटाला धक्का दिला. 28 उमेदवारांच्या अपात्रतेचा मोठा फटका विरोधी गटाला बसला. महाडिक गटाच्या प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या गाव आणि परिसरात सरासरी दीडशे ते दोनशे मताधिक्य घेतले. अमल महाडिक यांना शेवटच्या टप्प्यात खासदार धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांच्या आक्रमक प्रचाराची साथ मोलाची ठरली. उलट कुंभी साखर कारखान्यामुळे आमदार पी.एन. पाटील गटाचे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी उघडपणे प्रचार करणे अपेक्षित असताना ते उघड प्रचारापासून लांब राहिले. आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यामित्रांची उघड साथ सतेज पाटील यांना लाभली नाही. गोकुळनंतर सर्वच सत्ताकेंद्र सतेज पाटील यांच्या ताब्यात द्यायच्या नाहीत, ही भावना राजाराम निवडणुकीत प्रभावी ठरली.
हेही वाचा- Rajaram Election Results Update : विजयानं कोल्हापूरमधील राजकारण बदलेल-महादेवराव महाडिक
विरोधकांना गाफील ठेवून आपली राजकीय चाल खेळणे, मतदारांना भविष्याचा वेध देत आपलसं करण्यात सतेज पाटील यांचा हातखंडा आहे. सतेज पाटील गटाचे ‘आमचं ठरलयं’, ‘कंडका पाडायचा’ तर महाडिक गटाने सहकार वाचवूया हे प्रचार वाक्य घेवून सभासदांना साद घातली. महाडिक गटाने राजारामच्या निवडणुकीत जशास तशी रणनिती आखली आणि ती यशस्वी करुन दाखवली. पडद्यामागे मोठी फौज तैणात ठेवून मतदारांशी संपर्क कायम ठेवला. सोशल मिडीयासह प्रभावी प्रचारयंत्रणेचा वापर करत विरोधी आघाडीला जशास तशे उत्तर दिले. यासर्वाचा परिपाक म्हणजे महाडिक गटाने कसबा बावडा या सतेज पाटील यांच्या होमपिचवरील राजाराम कारखान्यात पुन्हा गुलाल उधळला.
अमल महाडिकांवर जबाबदारी
1990-95 पर्यंत पाच वर्षे आ. पी.एन. पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते. 1990 ते 2000 दहा वर्षे अरुण नरके गोकुळ दूध संघाचे चेअरमन होते. 1989 साली राजाराम कारखान्याची प्रथमच सार्वत्रिक निवडणूक झाली. भगवान पवार आणि विश्वास नेजदार यांच्या नृत्वाखाली पॅनल विजयी झाले. 1991 साली स्विकृत संचालक म्हणून महाडिकांचा कारखान्यात प्रवेश झाला. 1994 साली महाडिक आणि नेजदार यांनी पॅनल करुन सत्तांतर केले. 1994 साली महाडिक कारखान्याचे चेअरमन झाले. राजाराम कारखान्याच्या निमित्ताने मोठ्या महाडिकांचे सार्वत्रिक राजकारणात प्रवेश झाला. या अर्थाने राजाराम त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचे राजकीय केंद्र आहे. आता सलग सहाव्यांदा ते आपल्या ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले. भविष्यात राजाराम कारखाना आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक हे महाडिक गटाचे नेतृत्व करतील. याचे स्पष्ट संकेत निवडणूक प्रचार आणि विजयानंतर महाडिक गटाने दिले.
हेही वाचा- Photo : शिट्टी वाजवून, शड्डू ठोकत महादेवराव महाडिकांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष
जाबाबदारी वाढली
सतेज व महाडिक गटात लोकसभा नाही तर विधानसभा, गोकुळ नाहीतर राजाराम कारखाना, महापालिका अन् जिल्हापरिषद, यापैकी लढण्यासाठी काहीच नसेल दोन्ही गटात वैयक्तिक कुरघोड्याच आहेतच. नित्य वेगवेगळ्या मार्गांनी एकमेकांवर चिखलफेक करीत सतेज पाटील आणि महाडिक गट जिह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. चर्चेचा सूर आपल्याभोवतीच रहावा, त्यासाठी पध्दतशीरपणे राजकीय खेळी करणाऱ्या या दोघांनाही त्यांच्या या उद्देशात यश मिळते. नेत्यांतील भांडणामुळे कार्यकर्त्यांत वाढणारा जोष मात्र सामाजिक स्वास्थ बिघडविणारा ठरत आहे. राजाराम निकालानंतर याची धार वाढत जाण्याचा धोका आहे. राजकारणामुळे कोल्हापूरचे राजकीय आणि सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, सामाजिक पोत कायम राहिल याची जबादारी दोन्हीबाजूच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे.
पुन्हा टशन
येवू घातलेली महापालिका, जिल्हापरिषद यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात पक्षीय परिघाबाहेर पुन्हा लढत होईल. एकमेकांचे राजकीय उठ्ठे काढण्याचा कार्यक्रम यापुढेही सुरू राहिल. राजाराम कारखाना हा एक त्यातील टप्पा होता. यातील चुका आणि बलस्थाने शोधून त्यात सुधारणा करण्याची रणनिती आतापासून दोन्ही बाजूच्या थिंकटँकने हाती घेतले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








