सतेज चषक हॉकी स्पर्धा, लाईन बाजार मैदानावर हॉकीप्रेमींची सामने पाहण्यास गर्दी
कसबा बावडा प्रतिनिधी
येथील लाईन बाजारच्या हॉकी मैदानावर मंगळवारी सतेज चषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सामन्यात छावा मित्र मंडळ, हनुमान ब्लेसिंग व बुध्दीहाळकर-पाटील ट्रस्ट संघानी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.
लाईन बझार हॉकीप्रेमींच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 26 एप्रिल ते रविवार 1 मे दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख 50 हजार रूपये फिरता व कायमचा चषक, उपविजेत्या संघास रोख 30 हजार रूपये व कायमचा चषक तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघाना प्रत्येकी 10,000ªHe³es तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूलाही बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर शोभा बोंद्रे, स्वाती यवलुजे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पृथ्वीराज पाटील, सुरेखा पाटील, माधुरी लाड, सुभाष बुचडे, संजय मोहिते, डी.डी.पाटील, ताहीर शेख, विनोद बोगाळे, विशाल पाहुजा व विजय साळोखे-सरदार, मोहन भांडवले, नेताजी डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे अध्यक्ष धनंजय तोरस्कर, सुदाम तोरस्कर, संतोष पोवार, इजाज शेख, शकील म्हालदार, महंमद शेख, अविनाश सावंत व तुषार निकम यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, उद्घाटनापूर्वी सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात छावा मित्र मंडळाने संयुक्त लाईन बझार संघाचा 8 गोलनी पराभव केला. छावाकडून ओंकार जाधव ने 2, माज सय्यदने 2, माधव तोरस्क ने 2 तर शुभम जाधव व शापिन शेखने प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून संयुक्त लाईन बझारच्या प्रणव वाडकरला गौरविण्यात आले.
दुसऱया सामन्यात हनुमान ब्लेसिंग संघाने शिवतेज तरुण मंडळाचा 5-1 गोलनी पराभव केला. पूर्वार्धात हनुमान ब्लेसिंगच्या प्रमोद काळेने 9 व्या मिनिटांस पहिला गोल केला. त्यानंतर सागर धनगर याने 11 व 22 व्या मिनिटांस दोन गोल करत संघास 3 गोलची आघाडी दिली. उत्तरार्धात हनुमानच्या कमलेश तोरस्कर याने 30 व्या मिनिटांस गोल केला. त्यांनतर शिवतेजच्या सुमित कांबळे याने 42 व्या मिनिटांस मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. हनुमानच्या सागर धनगरने 45 व्या मिनिटांस तिसरा गोल करत हा सामना हनुमान ब्लेसिंग संघास जिंकून दिला. या सामन्यात उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान शिवतेजच्या सनी दळवीला मिळाला.
दुपारच्या सत्रात बुध्दीहाळकर-पाटील ट्रस्ट आणि तडाका तालीम यांच्यात झालेल्या लढतीत बुध्दीहाळकर ट्रस्टने 3-1 गोलने विजय संपादन केला. पूर्वार्धात 22 व्या मिनिटांस मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर बुध्दीहाळकर ट्रस्ट च्या नागेश देसाई याने गोल केला. उत्तरार्धात तडाकाच्या सिद्धांत घाटगे ने 27 व्या मिनिटांस गोलची परतफेड करत सामना 1-1 बरोबरीत आणला. बुध्दीहाळकर ट्रस्ट च्या राहुल रसाळने 42 व्या मिनिटांस गोल करत 2-1 ची आघाडी घेतली मात्र लगेचच 43 व्या मिनिटांस तडाका संघास मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर सिद्धार्थ घाटगेने दुसरा गोल करत पुन्हा सामना 2-2 बरोबरीत आणला. सामन्याची वेळ संपल्यामुळे शूटआउट चा वापर करण्यात आला. यामध्ये बुध्दीहाळकर ट्रस्टने हा सामना 3-1 गोलनी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात तडाकाच्या सिद्धार्थ घाटगे उत्कृष्ट खेळाडूच्या बक्षिसाने गौरविण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून शिवाजी डुबल, सागर जाधव, योगेश देशपांडे, दीपक पाटील, धिरज पाटील, राहुल गावडे, संदीप सावंत, संजय डोंगरे, चेतन जाधव, सुशांत निंबाळकर, दत्ता पाटील हे काम पाहत आहेत. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सागर यवलुजे, धनाजी तोरसकर, इजाज शेख, संतोष पोवार व ताहीर शेख अधिक परिश्रम घेत आहेत.
आजचे सामने
छावा मित्र मंडळ वि. एस.डी.पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) (सकाळी 7:30 वाजता)
देवगिरी फायटर्स (वडगाव) वि.हनुमान ब्लेसिंग (सकाळी 9:30 वाजता)
संजीवन पब्लिक स्कुल वि.पोलीस बॉइज (दुपारी 2:30 वाजता
रेल्वे बॉइज (पुणे) वि.पद्मा पथक (दुपारी 4 वाजता)









