कायदेशीर काम करत असताना एखाद्या अधिकाऱ्याचे खच्चीकरण करणे चुकीचे
कोल्हापूर : राज्य सरकार प्रचंड कर्जाच्या खाईत आहे. अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाही. अशावेळी कायदेशीर काम करत असताना एखाद्या अधिऱ्यांयांचे खच्चीकरण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या दृष्टीने दुर्देवी असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी केली. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिह्यातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे. अशातच उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम देखील रद्द केले. या सर्व प्रकरणावर मात्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे.
पहिली सेवा महाराष्ट्रात देता येईल काय?
आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालते. हा संदेश आता महाराष्ट्रातील जनतेमध्ये गेला आहे. सत्ता पाहिजे म्हणून काहीही सहन करायची तयारी भाजपची असल्याचे स्पष्ट होत आहे. यूपीएससी झाल्यानंतर पहिली सेवा महाराष्ट्रात देता येईल काय, हे स्वप्न अधिकारी पाहत होते. मात्र, यामध्ये आता वास्तवता राहिली आहे काय? अशी शंका या सर्व प्रकरणामुळे निर्माण झाल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
निर्णयाला मंत्र्यांचाच विरोध
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्याबाबत राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी देखील न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे प्रथमच घडत आहे.
जो निर्णय मंत्रिमंडळ घेत आहे. त्या मंत्रिमंडळातीलच मंत्री राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. यामुळे मंत्रिमंडळात दोन गट तट पडले आहेत. हे आता पाहायला मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडी पाहता मंत्र्यांच्या वरचा कंट्रोल देखील आता सुटल्याची टीका त्यांनी केली.
महायुतीच्या नेत्यांची अधिकाऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये
कायद्याचे पालन एखादा अधिकारी करत असेल तर त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. अशा लहान गोष्टींमध्ये स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी फोन करणे हे किती संयुक्तिक आहे. हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून नव्हती. महायुतीच्या अनेक नेत्यांची वक्तव्य ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधी असतात. एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला झापण्याचे प्रकार अनेकवेळा समोर आले आहेत. महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांत सरकारबाबत प्रचंड नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवीद मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न
गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या सोबत, शौमिका महाडिक यांची चर्चा झाली होती. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना देण्यात आली होती. असे असताना, केवळ राजकीय दृष्ट्या नवीद मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे काय अशी शंका आ. पाटील यांनी उपस्थित केली.








