कोल्हापूर : सामान्य माणसासाठी झटण्याचं काम पी. एन. पाटील यांनी केलं. म्हणून त्यांची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली. पी.एन पाटील यांनी हिंदीमध्ये भाषण केले याचे कौतुक. पण का भाषण केले हे काय वेगळं सांगायला नको, अशा शब्दात लोकसभेच्या उमेदवारीवरून सतेज पाटील यांनी पी.एन पाटलांना चिमटा काढला.
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित कोल्हापुरात सद्भावना दौड काढण्यात आली.या कार्यक्रमाला कन्हैया कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्या कडून दरवर्षी या सद्भावना दौडचे आयोजन केलं जातं.या कार्यक्रमाला सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजू बाबा आवळे, जयंत आसगावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, गेल्या नऊ वर्षात महागाई वाढवली. केंद्राने शेतकऱ्यांच्या खिश्यातून खताच्या माध्यमातून पैसे काढले. तेच पैसे तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात. केंद्राने तुमचेच पैसे तुम्हाला फिरवून दिले. ब्रिटिशांनी जशी लूट केली तशी लूट भाजपाकडून सुरु आहे. बँक खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने सामान्य माणसांच्या खात्यातून 35 हजार कोटींची लूट भाजपने केली.
भाजपचे काम समाजात दरी वाढवण्याचं काम केलं. डॉ. आंबेडकर यांच्या संविधानाने समतेचा संदेश दिला. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास पसरवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना त्रास कोणी दिला हे इतिहास पुस्तकात वाचा. ज्यांनी त्रास दिला तेच आता तरुणांची माथी भडकवत आहेत. भाजप जातीत मतभेद करण्याचे बीज पेरत आहेत. येणाऱ्या लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून देण्याची जबाबदारी तरुणांची आहे. दबावाचे राजकारण चालू आहे, पण त्याला बळी पडायचं नाही, असेही आवाहन त्यांनी यावेळी केलं.









