प्रतिनिधी,कोल्हापूर
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत साखर सहसंचालकांनी 29 उमेदवारांना राजकीय दबाबावतून अपात्र ठरविले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय साखर सहसंचालकांनी कॉपी-पेस्ट केला आहे, असा गंभीर आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयामुळे आमचे 29 उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडले असले तरी प्रचारामध्ये ते सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे महाडिकांच्या 21 उमेदवारांना आता आमच्या सक्षम अशा 50 उमेदवारांविरोधात लढावे लागणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
आमदार पाटील म्हणाले, ‘राजाराम’ची निवडणूक प्रक्रिया राजकीय दबावातून सुरू आहे. साखर सहसंचालकांकडे अपील केल्यानंतर त्यांना सोमवारी सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली होती. मात्र सुनावणी मुद्दाम एक दिवस वेळाने घेण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालही राखीव ठेवण्यात आला. सोमवार दहा रोजी दहा दिवस पूर्ण होत असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत निकाल देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे न करता रात्री बारा वाजता निकालाचे पत्र उमेदवारांना का दिले? राजकीय दबावातूनच अशा पद्धतीने निकाल देण्यात आला आहे. यामधून महाडिक कंपनी घाबरली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
पॅनेल होणारच, सर्व उमेदवार सक्षम
29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर महाडिक गटाने आमचे अन्य उमेदवार निवडणुकीत सक्षम नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडणुकीस सक्षम आहेत. त्यामुळे 29 उमेदवार अपात्र ठरले असले तरी आमचे 21 जणांचे पॅनेल असणारच आहे. तसेच त्यांच्यासोबत हे 29 उमेदवारही असणार आहेत. त्यामुळे महाडिकांनी ही निवडणूक त्यांच्यासाठी अवघड करून घेतली असून त्यांना आता आमच्या 50 सक्षम अशा उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
ज्याच्या हाती दप्तर तो मालक
आमचे 29 उमेदवार अपात्र कसे ठरतील याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. करारातील भंगावरून उमेदवारांना अपात्र ठरवू नका, अशी विनंती अधिकाऱ्यांना केली होती.कारण हा निर्णय केवळ राजारामपुरता मर्यादित राहणार नसून तू संपूर्ण राज्याला लागू होणार होता.अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून निर्णय घेतला.यावरून ज्याच्या हाती दप्तर तो आता मालक ठरणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
खासगीकरणाविरोधात आमची लढाई
राजाराम कारखान्याचे खासगीकरण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. या विरोधातच आमची लढाई सुरू आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी आम्ही लढा देत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कारखान्यात येलूरचे सभासद केल्याचे मान्य केले
राजाराम कारखान्यामध्ये येलूरचे सभासद केले असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनीच मान्य केले आहे. महाडिकानी येल्लूरचे सभासद केले पण त्यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरातील सभासद कारखान्यामध्ये का केले नाहीत? असा सवाल ही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
महाडिकांवर दारोदारी फिरण्याची वेळ
परिवर्तन आघाडीला सभासदांमधून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाडिकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने त्यांच्याकडून या पद्धतीचा रडीचा डाव खेळला जात आहे. गेल्या 28 वर्षात कारखाना निवडणुकीत महाडिकांनी कधी सभासदांची भेट घेतली नाही. मात्र या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने त्यांच्यावर आता सभासदांच्या दारोदारी फिरण्याची वेळ आली असल्याचा टोला आमदार पाटील यांनी लगावला
Previous Article… हे माझ्या बदनामीचे षडयंत्र
Next Article खंडपीठाचा लढा फक्त वकिलांचाच का?









