‘कुणाचेही न ऐकणाऱ्या फडणवीसांनी किमान देवाचं तरी ऐकावं’
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गासाठी मागील काही दिवसांपासून सातारा, सांगली, कोल्हापुरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, शक्तीपीठ महामार्ग नको, आमच्या जमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग होत असताना आणखी एका महामार्गाची काय आवश्यकता? असा सवाल यानिमित्ताने होत आहे.
कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. यामध्ये विरोधकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, काल स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि आज कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. पंढरपुरात अभिषेक करताना शक्तीपीठ महामार्गासंदर्भात फेरविचार करण्याची बुद्धी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंग देवूदे, असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केले. कुणाचेही न ऐकणाऱ्या फडणवीसांनी किमान देवाचं तरी ऐकावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, सव्वा वर्षापासून शक्तीपीठ महामार्गाची गरज नसल्याचे सांगत आहोत. महामार्गाविरोधात आवाज उठवत आहोत मात्र सरकार ऐकत नाही. जनतेचेही ऐकत नाही. सहा जुलैला मुख्यमंत्री विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूर येथे येणार आहेत. त्यावेळी त्यांनी याचा फेरविचार करावा अशी सद्बुद्धी त्यांना मिळूदे, अशी प्रार्थना विठुराया चरणी प्रार्थना करणार आहोत. तेच साकडं घालण्यासाठी पंढरपूरला निघालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
कारण शक्तीपीठ महामार्गासाठी होणारं आंदोलन राजकीय नसून शेतकऱ्यांचा आहे. ज्या पद्धतीने हिंदी सक्तीसाठी सरकारने दोन पाऊलं मागे घेतली, त्या पद्धतीने शक्तिपीठसाठी मागे जावं, असं ते म्हणाले. सरकार कर्जाच्या ढिगाराखाली आहे. बजेट नसतानाही अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्याला आर्थिक खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग नको अशी आमची मागणी आहे.








