सतेज पाटलांना पत्रकारांसमोर बोलण्याचे धाडस नसल्याने गोकुळच्या चेअरमन यांच्यावर दबाव आणून त्यांच्या सहीचे पत्रक अजिंक्यतारावरून काढत आहेत. गोकुळ दुधसंघावर मी केलेले आरोप जर खोटे असतील तर सतेज पाटील यांनी आपल्यासमोर एकाच व्यासपीठावर येऊन समोरासमोर बोलण्याचे आव्हान गोकुळच्या संचालिका शौमिका महाडीक यांनी केले आहे.
आज शौमिका महाडीक यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी गोकुळच्या सत्ताधारी पॅनेलवर आरोप केले. यावेळी बोलताना महाडीक म्हणाल्या; “सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एकीकडे दूध संघाची स्वतःच्या कुकर्माने वाताहत केलेली असताना, अजूनही वैयक्तिक आरोप करत आहेत.” असे त्यांनी म्हटले आहे.
आज माध्य़मासमोर बोलताना शौमिका महाडीक यांनी सतेज पाटील यांना आव्हान देताना म्हटले आहे कि, सतेज पाटील यांना समोर येऊन बोलण्याचे धाडस नाही. ते विद्यमान चेअरमन साहेबांना वेठीस धरून ‘जबरदस्तीने’ त्यांच्या सहीचे पत्रक काढत आहेत. मी गोकुळसंदर्भात केलेले आरोप जर खोटे असतील तर सतेज पाटलांना माझं खुलं आव्हानं आहे की, त्यांनी कधीही एका व्यासपीठावर सामोरासमोर यावं. पत्रकारांसमोर, लाइव्ह मीडिया समोर सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची माझी तयारी आहे. आणि त्यांनी स्वतः हे आव्हानं स्वीकारावं.” असं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मुळात कोणाच्या जावयांचा किंवा पै- पाहुण्यांचा ठेका आहे का हा माझ्या पत्रकार परिषदेचा मुद्दाच नव्हता. तरीही सवयी प्रमाणे जाणूनबुजून पै- पाहुण्यांवर घसरायचंच असेल तर संजय डी. पाटलांच्या मेहुण्याला कोणता ठेका दिला गेला ? विद्यमान चेअरमन- संचालक यांच्या पै- पाहुण्यांकडे किती ठेके आहेत ? कोणाचे किती पै- पाहुणे गोकुळमध्ये नोकरीला लावले गेले ? राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघ या नावांखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या आहेत ? पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणते नेते किंवा अधिकाऱ्यांनी काय percentage ठरवून दिलेले आहे ? जाहिरातींचा ठेका असेल किंवा नवीन नोकऱ्या असतील या साठी कोणी कोणाच्या माध्यमातून किती पैसे खाल्ले ? या सर्व गोष्टींचा खुलासा देखील मी करू शकते . पण वैयक्तिक टीका न करता संघ कसा टिकेल यावर आजही माझा भर आहे , याचं भान सर्वच सत्ताधारी नेत्यांनी ठेवावं.” असा सवालही त्यांनी केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “गोकुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूधाचे संकलन 7 लाख 98 हजार 466 लिटरने घटलेलं आहे. गोकुळची मुंबईमधील दूध विक्री 16 लाख 94 हजार लिटरने घटलेली आहे. पुण्यातील परिस्थिती चांगली असूनही सध्याच्या व्यवस्थेत वैयक्तिक द्वेषापोटी खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संघाच्या पोट नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था अ वर्ग सभासद कश्या झाल्या ? वाढीव संस्थांच्या तुलनेत जिल्यातील संकलन का वाढलं नाही ? आणि …. आजच्या खुलाश्यानुसार गृहीत धरायच झालं तर एक दिवसापूर्वी तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्या खोट्या होत्या का ? याचा जाहीर खुलासा सतेज पाटलांमध्ये हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर समोर येऊन द्यावा . तारीख , वेळ आणि जागा याची प्रतीक्षा करते.” असेही त्या म्हणाल्या.