कळंबा :
कळंबा–गारगोटी रस्त्यावरील कळंबा येथील तपोवन मैदानामध्ये 27 ते 30 डिसेंबर दरम्यान सतेज कृषी प्रदर्शन भरणार आहे. शेतकरी बांधवांना एकाचं छताखाली नवनवीन शेती विषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, राज्य कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कृषी प्रदर्शन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातले भव्य प्रदर्शन असून, शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यांनी केले आहे.
सतेज कृषी प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून, शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्या, 200 पेक्षा अधिक पशु–पक्षांचा समावेश, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी–बीयाणे, खते आदींची माहिती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रदर्शनाचे 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या समारंभाला आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांसह सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक विनोद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी डी. डी. पाटील, स्वप्नील सावंत, प्रफुल काटे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात 1 हजार 500 किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा आकर्षण असणार आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे, अशी माहिती संयोजक पाटील, रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजीत भोसले, सुनील काटकर यांनी दिली.
रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.
यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी–बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.
या प्रदर्शनात जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगांवचे वरिष्ठ कृषीविद्यावेता सुरेश मगदूम हे ऊस/केळी पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज, ठिबक सिंचनाची काळजी व देखभाल व खत व्यवस्थापन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर मुरघास तंत्रज्ञ व सेक्सेल सिमेंन याविषयी मार्गदर्शन माहिती चंद्रशेखर कुलकर्णी आणि डॉ सतीश कोगनुळे, चितळे जिनस ए. बी.एस हे मार्गदर्शन करणार आहेत.








