तोफखान्यात घडला प्रकार-नागठाण्याचा युवकाने काढली विवाहितेची छेड
प्रतिनिधी/ सातारा
शहरात एका भागात राहत असलेली विवाहिता शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून घेऊन घरी निघाली होती. यावेळी तालीम संघ येथील तोफखाना परिसरात ती पोहोचली. यावेळी नागठाण्याच्या एका युवकाने तिचा पाठलाग केला आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या युवकाला चोप देण्यास सुरुवात केली. बघता बघता जमाव जमला आणि युवकाला घेरुन मारहाण सुरू केली. तोच काही लोकांनी मद्यस्थी करून त्याला वाचवले. आणि शहर पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून नागठाणे येथील अजय बर्गे (वय 25) हा युवक शहरातील एका विवाहितेचा पाठलाग करत होता. ही बाब विवाहितेने शेजारील लोकांना सांगितली. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संबंधित विवाहिता मुलांना शाळेतून घेऊन घरी येत होती. यावेळी अजय बर्गे हा पाठलाग करू लागला. विवाहिता तोफखाना परिसरात पोहोचताच त्याने त्या विवाहितेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. ही बाब लोकांच्या लक्षात येताच त्याला पकडले. व छेडछाड का करत आहे, अशी विचारणा केली. यावेळी अजयने अरेरावी करायचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार बघून परिसरातील लोक एकत्र जमले. त्यांनी त्याला छेडछाड का करतोस अशी विचारणा करत चोप दिला. यामुळे काही काळ तेथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. युवकाला बेदम मारहाण सुरू असतानाच एकाने मध्यस्थी करत त्याला रिक्षातून शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी विवाहिता तिथे आली. त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी अनेकांनी केली. परंतु पोलिसांनी त्याला समज देऊन उशिरा सोडून देण्यात आले.
चालक नसल्याने पीसीआर बंद
दिवस-रात्र शहरात वॉच ठेवणारी शहर पोलीस ठाण्याची पीसीआर शुक्रवारी ड्रायव्हर नसल्याकरणाने बंद होती. यामुळे शहरात छेडछाडीची घटना घडूनही पोलिसांना घटनास्थळी पोहोचता आले नाही. तसेच वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने हाकेच्या अंतरावर असणाऱया वाहतूक शाखेच्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली नाही. यामुळे तेही कोंडी सोडवण्यासाठी आले नाहीत.
म्हणे विवाहिता माझ्या प्रेयसीसारखी दिसते
शहर पोलीस ठाण्यात छेडछाड करणारा युवक अजय बर्गे याला आणण्यात आले. यावेळी विवाहितेचा पाठलाग का केलास अशी विचारणा केली. यावर त्याने विवाहिता माझ्या पूर्व पेयसीसारखी दिसते म्हणून तिचा पाठलाग केल्याचे अजय बर्गे याने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.








