शहरातील किरकोळ व होलसेल व्यापारी म्हणाहेत आमचेच दुकान बरे
प्रतिनिधी/ सातारा
पूर्वी दिवाळी, दसरा व इतर सणांना बाजार खरेदी करण्यासाठी लगतच्या दुकानांमध्ये गर्दी होत असायची. उधार माल घेतला तरी तो व्यापारी काही दिवस थांबायचा. आता काळाप्रमाणे बदल साताऱयात सुद्धा होऊ लागला आणि मॉलची संस्कृती वाढू लागली आहे. साताऱयात चार ते पाच मॉल सध्या आहेत. कपडय़ापासून ग्रोसरीपर्यंतच्या वस्तू त्या मॉलमध्ये मिळू लागली आहेत. ऑनलाईनच्या जमान्यात सातारकर मॉलमध्येच खरेदी करु लागले आहेत. शहरातील व्यापारी म्हणताहेत आमचेच दुकान बरे. जवळचा दुकानदार तुमची फसवणूक करत नाही, वेळेला कोणतीही वस्तू देतो, असे सांगू लागलेत.
साताऱयात मोठय़ा शहराप्रमाणेच मॉल संस्कृती येऊ लागली आहे. काही वर्षापूर्वी शहरात अजिंक्य कॉलनीत विशाल मेगामार्ट होता. तो काही कारणास्तव बंद पडला. पुन्हा शहराबाहेर डीमार्ट सुरु झाला. त्यास शहराबरोबर जिह्यातून चांगली गर्दी होऊ लागली. त्याच धर्तीवर शहरात रिलायन्सचे दोन मॉल ग्रोसरीचे, एक कपडय़ाचा तयार झाला. तर गोडोलीमध्ये एक मॉल झाला आहे. तर कपडय़ाचा मॉल शनिवार पेठेत आहे. या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी महिला वर्गाचा मोठा कल दिसतो. विशेष करुन मॉलमध्ये गेल्यानंतर सर्व कसे टापटीप आणि सर्व वस्तू हव्या त्या घेता येतात. त्यामुळे जी आपल्याला वस्तू घ्यायची नसते तीही घेता येते. ग्राहकांना अधिक आकर्षित करुन मॉलमध्ये खरेदी करण्यावर मोठा भर दिसल्याचे आढळून येते. अगदी रांगा लागल्याचे दिवाळीत चित्र होते. तर दुसऱया बाजूला पारंपारिक आपल्या पेठेतल्या दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी होता परंतु एवढी उलाढाल होत नव्हती.
साताऱयातील मॉल
रिलॉयन्स मॉल, राधिका रोड
जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याच्या पाठीमागे विसावा नाका
जिओ मार्ट
कपडय़ाचे अनेक ठिकाणी मॉल
पार्किंगची समस्या
सातारा शहरात खरेदीला जाताना वाहने पार्किंग करण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे वाहन कुठे पार्क करायचे आणि दुकानात कसे जायचे. दुकानातून साहित्य कसे घेऊन यायचे हा प्रश्न ग्राहकांसमोर असतो. परंतु शहरात नव्याने झालेल्या मॉल्समध्ये तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था असते. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण येत नाही असेही ग्राहक सांगतात.
आम्ही घरपोहोच सुविधा देतो
ठराविक रक्कमेचे साहित्य खरेदी केले आणि त्यांनी जर घरपोहच साहित्य पोहच करण्याची विनंती केली की आम्ही त्यांना घरपोहच साहित्य पोहच करतो. त्याकरता 1500 रुपयांच्या साहित्यकरता फक्त 9 रुपये वाहतूक चार्ज लावला जातो. पत्ता देतील त्या ठिकाणी शहरात आम्ही मॉलच्यावतीने साहित्य पोहच करतो.
स्वप्नील कणसे, मॉलचे व्यवस्थापक
मॉलमुळे व्यापाऱयांचे हाल
आम्ही ग्राहकांना पैसे नसतील तरी उधारीवर साहित्य देत असतो. चार दिवस उशिरा पैसे दिले तरी त्यांना साहित्य देत असतो. परंतु मॉलमध्ये ऑनलाईन पेंमेट करावे लागते. जे पॅकेट तयार असतात. त्यामध्ये 500 ग्रॅम लिहिले असते परंतु त्यात 450 ग्रॅमचेच साहित्य असते, अशी ग्राहकांची फसवणूक होत असते. कोरोना काळामुळे आधीच व्यापारी मेटाकुटीला आला आहे. त्यात हे मॉलचे समीकरण साताऱयात येवून राहिले आहे. व्यापाऱयांना भाडे, लाईट, घरातील खर्चही बघावे लागते. त्यामुळे असेच जर सुरु राहिले तर व्यापाऱयांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल.
गोपाळ शेठ, व्यापारी
ऑनलाईनच्या जमान्यातही जवळच्या दुकानात खरेदी करा ही चळवळ
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. पूर्वीच्या काळी पुस्तके पोस्टाने मागवली जात होती. काळ बदलला आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ऑनलाईन मागवण्याची सोय होवू लागली. त्यामध्ये अमेझॉन, फिल्पकार्ड असे ऍप्स आले. आता तर त्या ऍप्सवरुन ग्रोसरीही येऊ लागली आहे. त्यामुळे अनेकजण घरबसल्या ऑनलाईन साहित्य मागवू लागले. परंतु ही धोक्याची घंटा ओळखून साताऱयातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याची चळवळ सुरु केली आहे. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.








