सातार्डा -प्रतिनिधी
सातार्डा – सातोसे – मडूरा जोडणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती सातोसे, कास, मडूरा गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून श्रमदानाने केली. रविवारी सकाळी सुरु केलेल्या रस्ता डागडुजीच्या कामात पंचक्रोशीतील पन्नासहून अधिक ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सातोसेचे माजी सरपंच वसंत धुरी, बबन सातोसकर,कास सरपंच प्रवीण पंडित,सातोसे ग्रामपंचायत सदस्य शांताराम पंडित, मडूरा माजी उपसरपंच विजय वालावलकर,जगन्नाथ पंडित,प्रसाद मांजरेकर,महेश मांजरेकर, पेद्रू डिसोजा, दामोदर बर्डे, नंदू पायनाईक, भगवान रेडकर, रामा पेळपकर, शरद पेडणेकर,बबन पंडित, मंगेश पेडणेकर, संदेश वेंगुर्लेकर व ग्रामस्थांनी श्रमदान केले.
सातार्डा, सातोसे, मडूरा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली होती. उत्तम स्टील कंपनीने संपादन केलेल्या रस्त्याच्या जमिनीवर खर्च करण्यास शासनाकडून लाल कंदील दाखवण्यात आला आहे . या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने एस टी गाड्या तसेच गोव्यातून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर ठरणाऱ्या कदंबा बस फेऱ्या बंद पडण्याची शक्यता होती.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांची पूर्वाम्पार रस्त्या अभावी गैरसोय झाल्यास एस टी, कदंबा बस फेऱ्या बंद होऊ शकतात या भीतीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकजूट करून सातार्डा, सातोसे, मडूरा रस्त्यावरील खड्डे बुजवून दुतरफा वाढलेल्या झाडी तोडल्या.सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर, वसंत धुरी,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर पेळपकर,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पंडित, प्रसाद मांजरेकर,संदेश राऊळ,गौतम मयेकर,बापू पंडित यांनी मोलाचे सहकार्य केले.गणेश चतुर्थी सणाच्या शुभ आगमनापूर्वी सातोसे, कास,मडूरा गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रस्त्याची दुरुस्ती श्रमदानाने केल्याने पंचक्रोशीमधून समाधान व्यक्त केले जात आहे.









