रामकृष्णनगर येथे शिवशाही झाली पलटी; नागठाणे येथे लालपरी गेली खड्ड्यात
नागठाणे : प्रतिनिधी
ग्वाल्हेर -बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर व नागठाणे या दोन ठिकाणी शिवशाही व लालपरी या एसटी बसना झालेल्या अपघातात शिवशाही बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी हे दोन्ही अपघात घडले
याबाबत घटनास्थळ व बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ग्वाल्हेर- बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कारने हुलकावणी दाखवल्याने शिवशाहीवरील चालकाचा ताबा सुटला आणि शिवशाही बस महामार्ग नजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये अठरा प्रवासी होते. यापैकी गंगुबाई शिवाजी पुजारी, हेमा अण्णाप्पा जाधव, सरुबाई अन्नप्पा जाधव, अमित अशोक भागवत, मोहन सावंत व आणखी एक जण असे सहा जण जखमी झाले.
याच दरम्यान कराड ते सातारा लेनवर नागठाणे गावच्या हद्दीत कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी चालकाचा चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस महामार्ग नजीकच्या नाल्यात गेली. या बसमध्ये वीस प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या दोन्ही अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई,श्री. घाडगे, हवलदार प्रकाश वाघ तसेच जनता अंब्युलेन्सचे अब्दुल सुतार,सोहेल सुतार,आजीम सुतार,समीर केंजळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शिवशाही बस अपघातातील जखमींना उपचारासाठी नागठाणे येथे पाठवले.या दोन्ही अपघातांमुळे महामार्गावरील वहातुक काही काळ विस्कळीत झाली होती.