प्रतिनिधी / सातारा :
दरोडा, जबरी चोरी, दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले होते. तो आरोपी शहरात फिरताना आढळून आल्याने शहर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. अजय देवराम राठोड (वय 30, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबाजार सातारा) असे त्यांचे नाव आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राठोड याला 1 वर्षाकरीता सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो शहरात छुप्या पद्धतीने फिरत असल्याचे माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली. त्यांनी डी.बी पथकाला आरोपी अजय याला पकडण्याचे आदेश दिले. डी.बी पथकाने शहर परिसरामध्ये शोध मोहिम घेवून तो राहत असलेल्या ठावठिकाण्याची माहिती घेतली. परंतु पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याला तडीपारी आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.









