उंब्रज/प्रतिनिधी
इंदोली परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पाऊस झाला या पावसाने सुमारे दोन तास झोडपून काढले. या पावसाने तारळी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदीपात्रात आले पिक धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या घटनेत इंदोलीतील दोन शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विक्रम गुलाबराव कदम यांची सुमारे 600 पोती आले नदीच्या पाण्यात बुडाली आहेत. तसेच युवराज लक्ष्मण जाधव यांची 100 पोती पाण्यात बुडाली आहेत. तसेच ट्रॅक्टर व टेलर नदीपात्रातच्या पाण्यात अडकला आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता अचानक तारळी नदीच्या पाण्यात वाढ झाली. या पाण्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. शेतकरी काही हालचाल करण्यापुर्वी सुमारे सहाशे पोती आले व ट्रॅक्टर व टेलर पाण्याखाली गेला आहे. या घटनेनंतर तारळी नदीच्या पुलावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तर तलाठी व सर्कल पंचनामा करण्यासाठी सायंकाळी उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत तारळी धरण व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता आज धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते असा निर्वाळा त्यांनी केला असून सुमारे ४० मि.मी पावसाची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.









