फलटण प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत
फलटण : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणातील फरारी असणारा प्रमुख संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा शनिवारी रात्री उशिरा फलटण शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने आता तपासाची चक्रे वेगाने फिरून या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर उजेडात यावे अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात एका खासदाराचा उल्लेख आला होता.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील कार्यक्रमात रणजित सिंहांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नसून त्यांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत रणजितसिंहांना क्लिनचिट दिली आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी भेट दिली. सदर घटनेतील तपासाबाबत त्यांनी तपासी अधिकाऱ्यांना काही गोष्टी सुनावल्या.








