परळी भागातल्या प्रवाशांची गैरसोय खपूवून घेणार नाही
प्रतिनिधी/सातारा
परळी भागात नादुरुस्त बसेस पाठवता. मध्येच बिघाड झालेल्या बसमधील प्रवाशांना इतर बसमध्ये बसवून दिले जात नाही. एसटीचे कर्मचारी एसटीच्या कर्मचाऱयांशी योग्य प्रकारे संवाद साधत नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होते. एसटी बसेस प्रवाशांसाठी आहे ना लोकांची गैरसोय करु नका, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजेंनी खडे बोल सुनावले. दरम्यान, विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांनी तात्काळ सुचना सातारच्या आगारप्रमुखांना दिल्या.
सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे, ठोसेघर या भागातील अतिदुर्गम अशा गावांमध्ये एस. टी. नियमितपणे सुरु नाही. एस. टी. बस सकाळी आली तर सायंकाळी येत नाही. शनिवार आणि रविवारी बस बंदच असते. अधिकाऱयांकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी आणि रोजंदारीसाठी कामाला जाणारा कामगार वर्ग तसेच महाविद्यालयीन तरुणींची मोठी गैरसोय होत आहे. अशा तक्रारी परळी, ठोसेघर भागातील ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंकडे केल्या. ग्रामस्थांची समस्या सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सातारा बस स्थानकातील विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात पोहचले. कार्यालयात विभागनियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह डेपो मॅनेजर आणि इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : छ. शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नव्या इमारतीत तोफा, मूर्ती पहायला मिळणार
यावेळी परळी, ठोसेघर भागातील ग्रामस्थही उपस्थित होते. परळी, ठोसेघर परिसरातील रस्ते चांगले आहेत मग तुमची बस का जात नाही. एस. टी.च्या अधिकायांना ग्रामस्थांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे नाही अशी परिस्थिती असून लोकांच्या गैरसोयींकडे तुम्ही गांभीर्याने पाहत नाही. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी स्वतःहून आपली बदली दुसरीकडे करून घ्यावी. मला काम करणारी माणसं पाहिजेत. त्यामुळे कोण कुठला आहे? जिह्यातला आहे का बाहेरचा आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही. तातडीने पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बससेवा सुरु झाली पाहिजे. अन्यथा मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा कडक शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित अधिकायांना खडे बोल सुनावले. तसेच तेटली, बामणोली या भागातही तीच परिस्थिती असून याठिकाणचीही बससेवा सुरळीत ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विभाग नियंत्रक पलंगे यांनी बससेवा त्वरित सुरळीत करतो आणि आपण स्वतः लक्ष ठेवतो असे सांगितले.
परळी भागातील ग्रामस्थांनी तरुण भारतकडे मांडल्या होत्या व्यथा
परळी भागातील ठोसेघर येथे कामानिमित्ताने साताऱयातून दररोज बसने जातात. बस सोनवडी गजवडीच्या दरम्यान बंद पडली. दुसरी बस कधी येईल हेही प्रवाशांना बसच्या चालक वाहकाने सांगितले नाही. तब्बल दोन तासानंतर आलेल्या बस चालकास विनंती केली तर त्यानेही बसमध्ये प्रवाशी घेतले नाहीत. त्या दिवशी संपुर्ण दिवस रस्त्यावर प्रवाशांना घालवावा लागल्याची कैफियत तरुण भारतकडे मांडली.