सातारा : प्रतिनिधी
पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील मंडल अधिकारी याला 40 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले. संजय रावसाहेब बोबडे वय 58 असे संबंधिताचे नाव असून या कारवाईने महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हा 67 वर्षाचा असून याच्या मोरबंदवाडी गावचे गट नंबर 28 मधील जमिनीतून स्वखर्चाने गाळ मुरूम माती काढून वाहतूक करण्याकरता भाड्याने वापरलेल्या जेसीबी व ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी व गौण खनिज काढल्यानंतर कारवाई न करणे कामी मंडलाधिकारी बोबडे याने आधी पन्नास हजार रूपये लाच मागितली. मात्र तडजोडीअंती चाळीस हजार रक्कम निश्चित झाली.
संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्याकडे तक्रार केली. वैद्य यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस अमलदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, विक्रम सिंह कणसे यांनी शनिवारी कार्यालय परिसरात सापळा रचला आणि बोबडे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.









