संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारपासून खंडित; नगरपालिकेची लाखो रुपयांची वीज बिले थकल्याने कारवाई
कराड प्रतिनिधी
कराड नगरपालिकेचे लाखो रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कराड नगरपालिकेच्या मुख्य वारूंजी जॅकवेलचा वीजपुरवठा तोडला. त्यामुळे शहरिच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कराड नगरपालिकेत अकाउंट विभागाच्या मअधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या अनुपस्थितीत ही कारवाई महावितरणने केली असून सुमारे लाखभर कराडकरांवर उद्या सकाळपासून पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या या कारवाईचे तीव्र पडसाद शहरात उमटायला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा >>>> 17 तासांनी वारूंजी जॅकवेलचा पाणी पुरवठा सुरळीत
कराड नगरपरिषदेची 24 तास पाणी पुरवठा योजना सध्या सुरू असून या योजनेला कोयना नदीवरील वारुंजी येथील मुख्य जॅकवेलमधून पाणीपुरवठा पाणी आणले जाते. महावितरणची दरवर्षी वीजबिले नगरपालिका अदा करत असते. यावर्षीची बिले अद्याप नगरपालिकेने दिलेली नसून त्याची रक्कम लाखोंच्या घरात आहे. महावितरणने याबाबत नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावाही केला होता. तथापि नगरपालिकेला हे पैसे भरणे शक्य झाले नव्हते. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता वारुंजी जॅकवेलचे विद्युत कनेक्शन तोडले. त्यामुळे पाणी पाणी उचलण्याची प्रक्रिया थांबली असून त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणासह सर्व प्रक्रिया ठप्प झाले आहे. यामुळे मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा होणार होण्याची शक्यता कमी झाली असून जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही तोपर्यंत कराडकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेचे मुख्य अकाउंटंट ढोणे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवे अकाउंटंट येत आहेतच तर मुख्याधिकारी रमाकांत डाके हेही अनुपस्थित असताना सोमवारी ही कारवाई झाली आहे. दरम्यान ही कारवाई महावितरणच्या मुख्य अधीक्षक अभियंत्यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कोरोना कालावधीतही महावितरणने कराड नगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर नगरपालिकेने पालिका हद्दीतील वीज खांब, ट्रान्सफॉर्मर याचे भूभाडे भरण्याबाबत महावितरणला नोटीस बजावली होती. या कारणावरून नगरपालिका व महावितरणमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. त्यातच योग्य मोका साधून महावितरणने ही कारवाई केल्याने संपूर्ण लाखभर कराडकरांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. मुळातच 24 तास पाण्याच्या बिलावरून शहरात अगोदरच गदारोळ उठला असून पाणीपट्टी भरण्याकडे नागरिकांचा कल नाही. त्यातच थकबाकी वाढत गेल्याने नगरपालिकेवर महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की आली आहे. यास पालिका अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.