केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; खासदारांच्या बैठकीत धनंजय महाडिक यांनी वेधले लक्ष; निविदा अंतिम टप्प्यात
कोल्हापूर प्रतिनिधी
सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम येत्या दिवाळीच्या दरम्यान सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक गडकरी यांनी दिल्लीतील आपल्या मंत्रालयात बोलविली होती. भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी या बैठकीत सहापदरीकरणाच्या रखडलेल्या कामाकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले.
या बैठकीत मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला. त्याचबरोबर नव्याने जे प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत, त्यांच्या सद्यःस्थितीचीही माहिती घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी, सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडल्याने प्रवासी वाहतुकीसह इतर वाहतुकीला, वाहनधारकांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. त्यामुळे सहापदरीकरणाचे काम लवकरात लवकर होण्याची आवश्यकता असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. त्यावर मंत्री गडकरी यांनी सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, 12 कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रूपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष सुरवात होईल, असे स्पष्ट केले.
सहापदरीकरणाच्या कामात असलेला बास्केटब्रीजही साकारणार
कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर होणारा बास्केट ब्रीज, याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. याबद्दलची माहिती खासदार महाडिक यांनी मंत्री गडकरी यांना दिली. सहापदरीकरणाच्या कामाबरोबरच बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
बास्केटब्रीज कायम स्वरूपी उपयुक्त : खासदार महाडिक
बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहील. तसेच शिरोली नाक्याकडून कोल्हापूरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. बास्केटब्रीज साकारण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.
असा आहे सहापदरीकरणाचा प्रकल्प
मार्ग : सातारा ते कागल
अंतर : सुमारे 132 किलोमीटर
अपेक्षित खर्च : साडेचारहजार कोटी रूपये
निविदा : 12 कंपन्यांच्याकडून निविदा दाखल
कामास प्रारंभ : ऑक्टोबर दरम्यान