सातारच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा असे नांव देण्याचा निर्णय आज राज्यशासनाने घेतला आहे. याचे आम्ही स्वागत करतो. ऐतिहासिक सातारा नगरीतील वैद्यकिय महाविद्यालयासारख्या मोठया महत्वाच्या वास्तुस समर्पक नाव दिले गेल्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाला योग्य तो सन्मान दिला गेला आहे असे अधिकारवाणीचे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
सातारचे वैद्यकिय महाविद्यालय आमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सर्वांच्या सहकार्याने सन 2014 साली मंजूर झाले होते. त्यासाठी 500 खाटांच्या अटींची पूर्तता, 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन करण्यात आली. त्यामुळे 500 खाटांचे रुग्णालयाची अट पूर्ण झाली. तथापि मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या अनेक क्लिष्ट निकषांची पूर्तता करण्यात तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक असणारी मोठी सोयीची जागा उपलब्घ करुन घेण्यात बराच कालावधी लोटल्यावर गतवर्षी सातारच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली. सातारला वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाल्याने, अनेक दृष्टीकोनामधुन सातारच्या सर्वांगिण विकासाच्या वाटचालीत जाणवण्याइतका लाभ दिसू लागला.
या महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि युगपुरुष “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे सुपूत्र असलेल्या “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नांव देण्याबाबतची विनंती आम्ही राज्यशासनास सुमारे एक वर्षापूर्वी केली होती. तसेच नुकत्याच जुलै 23 च्या ना.देवेंद्र फडणवीस यांच्या क-हाड दौ-यात देखिल सातारच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नांव देण्याबाबत स्वतंत्र पत्रप्रस्ताव दिला.
मराठा साम्राज्याची तत्कालीन राजधानी असलेल्या साता-यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची आवश्यक अशी नोंद घेतली गेली नाही याची खंत आम्हास सातत्याने बोचत होती. भारताचे भविष्य वैद्यकिय शिक्षण घेणा- यांच्या हातामध्ये आहे. आतर्राष्ट्रीय निकषाप्रमाणे भारतात सार्वजनिक आरोग्य सेवा पुरेश्या प्रमाणात प्रदान करण्याचे सरकारचे प्रयत्न अखंड चालु आहेत. त्यामुळेच वैद्यकिय शिक्षण घेवून बाहेर पडणारी तुकडी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून आता बाहेर पडणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव ऐतिहासिक भुमीतील वैद्यकिय महाविद्यालयाला देण्याबाबत आम्ही सर्वंकष विचार करुन वरील प्रमाणे प्रस्ताव दिला होता.
आमच्या प्रस्तावाची योग्य ती दाखल घेत आज राज्यशासनाने शासन निर्णय क्रमांक वैशिवि-2023/प्र.क्र.119/ प्रशासन-2 दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजीच्या निर्णयाव्दारे सातारच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे “छत्रपती संभाजी महाराज” शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय,सातारा असे नामाधिकरण करण्यात आल्याचे व त्या अनुषंगाने मा.आयुक्त वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांनी पुढील कार्यवाही करावी असा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयामुळे “छत्रपती संभाजीमहाराज” यांच्या धगधगत्या कार्यकर्तुत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंड मिळत राहणार आहे. आमच्या मागणीनुसार सर्वसमावेशक नामाभिधान राज्यशासनाने केल्याने, विशेष करुन उपमुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस तसेच मा.उपमुख्य मंत्री ना. अजित पवार, मुख्य मंत्री ना.एकनाथ शिंदे, व मंत्रीमंडळाचे तमाम जनतेच्या वतीने आणि व्यक्तीश: आमच्या वतीने अभिनंदन आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.









