आंबळे येथील बैलास लम्पी त्वचा रोगाची लागण : पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपाययोजना
वार्ताहर/परळी
सातारा तालुक्यात महागाव, माजगाव या गावात लम्पीची लागण मोठय़ा प्रमाणावर झाली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये पशुधनाबाबत चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. त्यातच परळी खोऱयातील अतिदुर्गम भागातील आंबळे या गावातील बैलास लम्पी त्वचा रोग झाल्याने पशुवैद्यकिय विभाग सतर्क झाले असून बाधीत बैलासह 85 गायी व बैलांचे एलएसडी लसीकरण करण्यात आल्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एस. कदम यांनी सांगीतले.
आंबळे (ता. सातारा) येथे गेल्या 2 दिवसांपासून एका बैलास मोठ-मोठय़ा फोड्य़ा आल्याने डॉ. कदम यांनी स्वत: पाहणी केली व लक्षणे ही लम्पी सदृश्य आजार असल्याचे आढळून आल्याने शनिवारी लम्पीचा प्रार्दभाव भागात झाल्याचे सांगीतले. त्यांनतर तत्काळ पशुधन विकास विभागातून जिल्हा उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी आपली टीम पाठवून ताबडतोब लस उपलब्ध करून दिल्याने पशुवैद्कीय विभागाने आंबळे, रायघर येथील जानांवरांचे लसीकरण करण्यात आले. तसेच गावत, गोचिड नाशक औषध फवारणी तसेच त्या बैलास ३ दिवसांपासून मोफत उपचार सुरु असून त्याचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर बैलाची प्रकृती स्थिर असून भीतीचे कारण काही नाही तर जशी लस उपलब्ध होईल तशी येत्या चार दिवसात भागातील लसीकरण पुर्ण करण्यात येईल असे ‘तरुण भारत’शी बोलताना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एस. कदम यांनी सांगीतले.









