सातारा :
अमृत महाआवास अभियान 2022-23 जिह्यात प्रभावीपणे राबवल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात पुन्हा एकदा डंका निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्यासह विजेत्या गावांनी स्वीकारला आहे. पुरस्काराच्या रुपाने विजेत्या गावांच्या पाठीवर कौतुकाची थाप मुख्यमंत्र्यांनी दिली असून अमृत महा आवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये येळगाव (ता. कराड) ग्रामपंचायत प्रथम तर भुडकेवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने राज्यात व्दितीय क्रमांक पटकवला आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये बोंद्री (ता. पाटण) या ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय सचिव दया प्रसाद, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत अमृत महा आवास अभियान 2022-23 चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व पंचायत समिती सभागृहांमध्ये करण्यात आले. यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये लाभार्थ्यांना आवास मित्र या अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले. पुणे विभागाने राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. या पुरस्काराचा स्वीकार विभागीय आयुक्त, अपर आयुक्त (विकास) व सहाय्यक आयुक्त (विकास) यांनी केला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी .विश्वास सिद, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी स्वीकारला.
अमृत महाआवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागामध्ये जावली तालुक्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. पुरस्कार जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील व तत्कालिन गट विकास अधिकारी रमेश काळे यांनी स्वीकारला. अमृत महा आवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत विभागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये येळगाव (ता. कराड) प्रथम क्रमांक तर भुडकेवाडी (ता.पाटण) ग्रामपंचायतीने राज्यात व्दितीय क्रमांक पटकवला आहे. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये बोंद्री (ता. पाटण) या ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्काराचा स्वीकार पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील व पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती सरिता पवार व संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केला. या उपक्रमामार्फत ग्रामीण भागातील आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला चालना मिळून ‘घरकुल स्वप्न’ प्रत्यक्षात उतरविण्यास मदत झाली आहे. अमृत महा आवास अभियान 2022-23 राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये यावर्षी देखील सातारा जिल्हा परिषदेने आपले वैविध्यपूर्ण व सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन करत राज्य पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे.








