गोडोली : प्रतिनिधी
स्थानिकांनी रस्त्याच्या कामाच्या तक्रारीचा पाढा सुरू केला, मजबुती करणासाठी पक्का नाही तर माती मिश्रित मुरुम टाकलेला दाखविला, काही ठिकाणीची पाहणी केली, अवघ्या १२०० मीटरसाठी ६ कोटी मंजूर असताना कामात मुरुम कमी आणि माती जास्त टाकली आहे, कामाच्या ठिकाणी बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाहीत, असे स्थानिकांनी सांगताच, आमदारांनी तत्काळ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दराडे यांना फैलावर घेत कामाच्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना घेऊन या, पहा, पंचनामा करून कामाच्या गुणवत्तेची तपासणी करा, माझ्या फंडातील कोणत्याही कामाच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही, असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. आमदारांचा राग पाहून कामावरील कामगार थरथरत होते तर स्थानिकांनी आमदार महेश शिंदे यांची तळमळ आणि कर्तव्य निष्ठा पाहिली.
औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या देगाव फाट्यापासून रस्त्याची पुरी वाट लागली होती. अतिक्रमणामुळे स्थानिकांचा कामास विरोध होत होता. आमदार महेश शिंदे यांनी स्थानिकांशी चर्चा करून समस्या दूर करत अतिक्रमण काढून रस्त्यासाठी बीग बजेट मंजूर केले. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या देगाव फाटा ते पावथका कोडोली या १२०० मीटर अंतर असलेल्या रस्त्याचे तब्बल ६ कोटी खर्चाचे काम प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या डांबरीकरण काम सुरू असताना माती मिश्रित मुरुम टाकला जात असल्याचे आमदार महेश शिंदे यांना स्थानिकांनी कळवले.
आमदार महेश शिंदे यांनी गुरुवार दि.२८ रोजी दु.१२ च्या दरम्यान प्रत्यक्ष कामावर अचानक येऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली.
अवघ्या १२00 मीटर रस्त्यासाठी ६ कोटी बजेट असताना माती मिश्रित मुरुम टाकलेले पाहताच त्यांना संताप अनावर झाला. याबाबत स्थानिकांनी तर कामात गुणवत्ता नसल्याचे दाखवून दिले. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी येतात का अशी विचारणा केली असता ते फिरकत नसल्याचे सांगितले. लगेच कार्यकारी अभियंता दराडे यांना कामाच्या ठिकाणची परिस्थिती सांगून तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसोबत येऊन पंचनामा करा. झालेल्या कामाची गुणवत्ता बघा दोषी आढळल्यास ठेकेदाराला ब्लँकलिस्टमध्ये टाकण्याची तयारी ठेवा, असे सांगितले.