काही दिवसात होणार संग्रहालय सुरुः अभिरक्षक प्रवीण शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/सातारा
सातारा शहरात असलेले जुने संग्रहालय हे शासनाच्या भाड्य़ाच्या जागेत भरत होते. नवीन इमारत होवूनही त्यात संग्रहालय सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण होत होते. पाठपुरावा सातत्याने करुन प्रशासनाने पुरातत्व विभागाच्या ताब्यात इमारत दिली. शनिवारी दिवसभरात स्वतः अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी जुन्या संग्रहालयाच्या इमारतीपुढे असलेल्या तोफा, प्राचीन मूर्ती क्रेनच्या सहाय्याने घेवून नव्या इमारतीच्या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात नवे संग्रहालय लोकांसाठी खुले होणार आहे.
साताऱयात असलेले संग्रहालय हे शेतकरी निवासमध्ये भरत होते. त्यासाठी महसूल विभागाला पुरातत्व विभागाकडून भाडे दिले जात होते. शेतकरी निवासची इमारत 1967 – 68 च्या दरम्यान होती. पुरातत्व विभागाला छ. शिवाजी महाराज संग्रहालयासाठी हक्काची इमारत उभारण्यात आली. या इमारतीचे भूमिपूजन 27 फेबूवारी 2009 रोजी झाले. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर कोरोना काळात या इमारतीचा वापर जंबो इमारत म्हणून करण्यात आले. कोरोनाच्या नंतर ती इमारत महसूल विभागाने पुरातत्व विभागाच्या ताब्यात देणे गरजेचे होते. त्यांच्याकडून इमारत ताब्यात देण्यास विलंब लागला. सततच्या शिवभक्ताच्या मागणीमुळे प्रशासनाने अखेर पुरातत्व विभागाच्या ताब्यात इमारत दिली. जुन्या संग्रहालयाच्या इमारतीच्या समोर ऊन पावसात भिजतच पडलेल्या दगडी तोफा, देवदेवताच्या मूर्ती, शिलालेख, विरगळी या तशाच होत्या. त्या शनिवारी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक्टर ट्रॉलीत भरल्या. तेथून त्या नव्याने ताब्यात आलेल्या इमारतीच्या परिसरात आणण्यात आल्या.
लवकरच संग्रहालय सुरु करण्यात येणार
नव्याने झालेल्या इमारतीमध्ये संग्रहालय लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्याकरता जुन्या इमारतीत असलेल्या सर्व वस्तू, साहित्य नव्या इमारती आणले आहे. संग्रहालयाची संपूर्ण तयारी झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने लवकरच सुरु करण्यात येईल. – प्रवीण शिंदे अभिरक्षक छ. शिवाजी संग्राहालय