सातारा प्रतिनिधी
कोरेगाव वाघोली ( ता . कोरेगाव ) येथे जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सासरा सुनील शंकर भोईटे ( वय- 48 ) याचा जागीच मृत्यु झाला आहे . या घटनेने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे . या घटनेनंतर पिंपोडे येथील रूग्णालयात लोकांनी मोठी गर्दी केली होती .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी , वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे . सदरचा दावा सुनील भोईटे यांनी दाखल केलेला आहे , अशीही माहिती मिळत आहे . यावरून नामदेव भोईटे यांचे जावई आणि सुनील भोईटे यांच्यात वादविवाद झाले होते . आज सायंकाळी सात वाजणेचे सुमारास नामदेव याचे जावई रवी यादव व सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले . त्यावेळी भोईटे यांचा मुलगा माझ्या वडिलांना मारू नका म्हणुन हात जोडून विनवण्या करीत होता . मात्र तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र , तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला . संशयित रवी यादव व सुनिल यादव ( मुळ रा . सोळशी ता.कोरेगाव ) हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असतात . गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले . घटनेसंदर्भात वाठार पोलीस अधिक तपास करीत आहेत .