सातारा : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
गेली अनेक वर्षे सुनील काटकर हे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे विश्वासू समर्थक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकास, सहकार याचा गाढा अभ्यास असलेल्या सुनील काटकर यांचे संघटन कौशल्यही उत्कृष्ट आहे. उदयनराजेंची सावली म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. सुनील काटकर यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद भूषवले आहे. सभापतीपदाच्या कारकिर्दीत सातारा जिल्ह्यात उदयनराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात निर्माण करण्यात काटकर यांना यश आले होते.
उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघात संघटन कौशल्याची जबाबदारी काटकर यांच्याकडेच असते. काटकर यांचे संघटन कौशल्य, बेरजेचे राजकारण करण्याची हातोटी व प्रभावी जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा मतदारसंघाचे निवडनुक संयोजक म्हणून काटकर काम पाहणार आहेत याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत केली. बावनकुळे यांच्या हस्ते काटकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी व भाजपच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती होताच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी काटकर यांचे अभिनंदन केले.









