प्रतिनिधी,सरवडे
सरवडे ग्रामपंचायत मार्फत पुकारलेल्या मुर्ती व निर्माल्य दान उपक्रमाला साथ देत पाचशेवर नागरिकांनी गणेश मुर्तींचे नदीत विसर्जन न करता मुर्ती दान केल्या. मुर्ती व निर्माल्य दान करण्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेले अनेक वर्षे संत रोहिदास मंडळ व गावातील पर्यावरण प्रेमी युवक निर्माल्य व मुर्ती गोळा करून त्याचे योग्य पद्धतीने विसर्जन करीत होते. यावर्षी ग्रामपंचायतीचे प्रशासक आर. बी. जंगम व ग्रामविकास अधिकारी मनोहर बोटे यांनी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी गौरी निर्माल्य व गणेश मुर्ती नदीत विसर्जित न करता दान कराव्यात असे आवाहन केले होते.
त्यानुसार ग्रामपंचायतीने दुपारपासून मुर्ती गोळा करण्यास सुरुवात केली. ग्रामविकास अधिकारी बोटे, कर्मचारी यांच्यासह गावातील पर्यावरण प्रेमी युवकांनी मुर्ती गोळा केल्या. गौरी निर्माल्यही गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला बहुतांशी ग्रामस्थांनी सहकार्य केले त्यामुळे पाचशेच्या वर मुर्ती नदीत विसर्जित करता दान करण्यात आल्या. पर्यावरण पूरक उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी आभार व्यक्त केले.