भाजपपेक्षा 4 पट अधिक जागांवर आघाडी : ममता बॅनर्जी यांचा करिष्मा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला लोकसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट असे संबोधिले जात होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस या लिटमस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ‘बंपर’ विजय मिळविला आहे. या निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्याने वादही निर्माण झला आहे.
राज्यातील 63,229 ग्रामपंचायत सदस्य, 9730 पंचायत समितीच्या जागा आणि जिल्हा परिषदेच्या 928 जागांसाठी 8 जुलै रोजी मतदान झाले होते. ग्राम पंचायत निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. तृणमूलने ग्रामपंचायतीच्या 19332 जागांवर आघाडी मिळविली आहे. तर भाजपला 4,592 जागांवर यश मिळाले आहे. तर माकपला केवळ 2,152 जागांवर आघाडी मिळविता आली आहे. काँग्रेस पक्ष 1,730 जागांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही तृणमूल वरचढ ठरला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने पश्चिम बंगालमधील या निवडणुकीत स्वत:चे खाते उघडले आहे.
निवडणुकीदरम्यान राज्यात झालेल्या हिंसेत 39 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हिंसेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आनंद सी.व्ही. आनंद बोस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांना स्थितीची माहिती दिली आहे.









