देवीला अभिषेक करुन कुंकुमार्चनाचाही केला विधी : देवस्थान समितीकडून शाल, श्रीफळ व अंबाबाईचा साडी-चोळीचा प्रसाद देऊन सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीला अभिषेक करुन षोडशोपाचर पूजाही केला. श्रीसुक्त आवर्तनाने कुंकुमार्चनाचा त्यांनी विधी करतानाच देवीचे नामस्मरणही केले. देश प्रगतीपथावर जाऊ दे अशी मनोकामना व्यक्त करत देवीला प्रदक्षिणाही घातली. पुजारी सचिन ठाणेकर, सुधाकर सांगळे व आशुतोष ठाणेकर विधींचे यांनी पौराहित्य केले. भागवत यांचे दर्शन कार्य पूर्ण होईपर्यंत मंदिरात येणारी भाविकांची दर्शन रांग सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली होती.
श्री भागवत हे गेल्या रविवारी सांगलीत झालेल्या लोकमान्य टिळक संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सांगलीतील कार्यक्रम पूर्ण करुन सोमवारी ते रत्नागिरी दौऱ्यावर गेले. तिकडे जातेवेळी त्यांनी कुलस्वामिनी अंबाबाईचे दर्शन घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार झेडप्लस सुरक्षेत भागवत यांच्या वाहनाचा ताफा सकाळी 7 वाजता अंबाबाई मंदिराजवळ आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी प्रशासक प्रशांत बनसोडे व श्रीपुजक मंडळाचे अजित ठाणेकर, आशुतोष कुलकर्णी यांनी भागवत यांचे स्वागत केले. यानंतर सुरक्षा कवचाखाली ते मंदिरात गेले. त्यांच्यासोबत संघाचे जिल्हा संघचालक सूर्यकिरण वाघ, शहर संघचालक प्रमोद ढोले, सहकार्यवाह महेश कोगेकर आदी मान्यवरही होते.
भागवत यांनी नियमानुसार सोवळ नेसून अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीचे दर्शन घेऊन अभिषेक व कुकुमांर्चनाचा विधी केला. यानंतर मंदिर व देवस्थान समितीच्या वतीने सचिव प्रशांत बनसोडे यांनी भागवत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. साडी-चोळीचा प्रसादही दिला. यावेळी श्रीपुजक मंडळाचे उमेश उदगावकर, केदार मुनिश्वर, मकरंद मुनिश्वर, आशुतोष ठाकूर आदी उपस्थित होते.