सातारा प्रतिनिधी
वाठार किरोली गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील यांच्या मुलाने वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सभेत माझ्या वडिलांवर टीका का केली याचा जाब विचारत नागझरी गावचे लोकनियुक्त सरपंच आणि सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माजी पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले यांनी दूरध्वनीवरून नारायण गायकवाड यांना शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला असून, एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून, परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
जितेंद्र भोसले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मी माझ्या पाळीव कुत्र्याला औषध देण्यासाठी चारचाकीतून वाठार किरोली येथील जनावरांच्या शासकीय दवाखान्यात आलो होतो. गावात पोहोचल्यानंतर दवाखाना माळावर स्थलांतरित झाल्याची माहिती मला मिळाली. पावणेएकच्या सुमारास कहाड मर्चंट बँकेसमोर आलो असताना, किरण गायकवाड यांनी माझी गाडी आडवून ‘तुला यापूर्वी माझ्या वडिलांनी पंचायत समिती येथे समज दिली होती, तरीही तू आमदारांच्या सभेत आमच्यावर टीका का केली?’ अशी विचारणा करत, किरण पाटील व नारायण गायकवाड या दोघांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच ‘तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली. यावेळी उपस्थित लोकांनी भांडणे सोडविली, परंतु या भांडणास काही लोकांची फूस असण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जितेंद्र भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत अशी मागणी केली आहे. या प्रकरणी किरण पाटील व नारायण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास माजी पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले यांनी दूरध्वनीवरून नारायण गायकवाड यांना ‘माझा नवरा जितेंद्र भोसले यांना तुम्ही का मारले, अशी विचारणा करत शिवीगाळ व दमदाटी केली,’ अशी फिर्याद राजकिरण भीमराव पाटील यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी प्रतिभा भोसले याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करत आहेत.
वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन भिमराव पाटील यांनी काही महिन्यापूर्वी केले होते आणि तदनंतर काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी भूमिपूजन केले होते. भूमिपूजन कार्यक्रमात जितेंद्र भोसले यांनी भिमराव पाटील यांच्या वर नाव न घेता टीका केली होती. याच पार्शवभूमीवर हा प्रकार घडल्याची वाठार परिसरात चर्चा सुरू आहे.