पारंपरिक राजकीय विरोधकांचा याराना : सावध नेत्यांचे निकालाकडे लक्ष
संतोष पाटील,कोल्हापूर
महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिह्यात भाजप विरुध्द काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष अशी राजकारणाची पक्षीय विभागणी झाली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यात शिंदे गटाची भर पडली. ही राजकीय सरमिसळ कमी होती म्हणून आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा खिचडी झाली आहे. इतर निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटलेले अनेक गावातील कारभारी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने एकमेकांच्या गळय़ात गळे घालत असल्याचे चित्र आहे. गावगाडय़ातील ही राजकीय समीकरणं औटघटकेची ठरणार असल्याने नेते बघ्याच्या भूमीकेत आहेत. सरमिसळीतून होणाऱया निकालाचे राजकीय कंगोरे आणि अर्थ वेगवेगळे असले तरी श्रेयवादावरुन रंगणारे वाकयुद्ध करमूक करणारे ठरेल.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तेपर्यंत पोहचले. हीच एकी गोकुळच्या निवडणुकीतही टिकली. जिल्हा बँकेत शिवसेनेचा एक गट बाजूला गेला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली होती. पक्षीय आणि संस्थात्मक राजकारण यात फरक असल्याचे सांगत नेत्यांनी सोयीच्या आघाडय़ा केल्या. हाच पायंडा आता गावगाडय़ापर्यंत पोहोचला आहे. तालुका आणि जिह्याच्या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असणारे गावातील राजकारणात एकाच व्यासपीठावर आले आहेत. यातून अनेक ठिकाणी बिनविरोधाचे गणित जमले.
करवीर तालुक्यातील अनेक गावात आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, महाडिक गटात सरमिसळ आहे. जनुसराज्य आघाडीचे नेते आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील आणि महादेवराव महडिक गटाचे कार्यकर्ते अनेक गावात एकाच व्यासपीठावर आहेत. ‘आमचं ठरलयं’चा नारा देणारे हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक, समरजीत घाटगे यांचे समर्थक अनेक गावात एकत्र तर काही ठिकाणी विरोधात आहेत. माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी, गणपतराव पाटील, उल्हास पाटील यांचे समर्थक एकाच दिशेने जाताना दिसतात. राधानगरी-भुदरगड-आजरा तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील, ए. वाय. पाटील गट या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे वास्तव आहे. हातकणंगलेत महाडिक विरोधात आमदार राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर अशीही आघाडी काही गावात कार्यकर्त्यांची झाली आहे. राजकीय अभिनिवेष बासनात गेल्याने कधी नव्हे इतकी जिह्याच्या राजकारणाची मिसळ झाली आहे.
राजकीय साथ महत्वाची
अनेक गावात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पारंपरिक राजकीय मित्र पक्षांची ताटातूट झाली आहे. भाजप आणि दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी झाल्याचे काही गावातील चित्र आहे. शिवसेनेला गृहीत धरुनच राजकीय व्युह रचना आखणाऱया दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी अनेक गावात त्यांना एकटे पाडले आहे. काही ठिकाणी शिवसेनेपेक्षा दोन्ही काँग्रेसला भाजपची साथ महत्वाची वाटली आहे.
अडीच घरांचा खेळ
अनेक ठिकाणी भाजपने दोन्ही काँग्रेससोबत जाणे, शिवसेनेने काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसला बिटकुळय़ा दाखवत खिजवणे, ग्रामपंचायतीनंतर शिवसेनेला पुन्हा आपल्या सोबत मुळ प्रवाहात आणण्याचा दोन्ही काँग्रेसची व्युह रचना, निवडणुकीत भाजपसोबत दोन्ही काँग्रेसचे राजकारण आदी घडामोडीमागे बुध्दीबळाच्या पटातील अडीच घरांचा खेळ आहे. कोण कुठे उडी मारुन चेक-मेट करेल याचा नेम नाही. या पटावर जो बाजी मारेल तोच गावच्या राजकारणात तग धरणार असल्याने या सोयीच्या राजकारणाला ‘पॉलिटिकल बुस्टर’ चे गोंडस नाव देऊन पांघरुन घातले जात आहे.
येत्या काळात शिंदे गटाच्या साथीने भाजपमध्ये पुन्हा स्फुर्लिंग चेतविण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे आहे. भाजपपेक्षा शिंदे गटास ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय दृष्टया प्रति÷तेची आहे. ज्यांच्या विरोधात निवडणुकीत प्रचार केला, विजयाचा गुलाल उधळला. पराजय पचवला तीच गावगाडय़ातील नेते मंडळी अनेक ठिकाणी एकाच व्यासपीठावर आली आहेत. वरवर सरळ वाटणाऱया या घटनांना मात्र अनेक राजकीय पैलू आहेत. निकालानंतर जिल्हा पातळीवरुन निकालाचे विश्लेषण केले जाईल. एक-एक गाव आणि विजयी उमेदवार मोजून मापून घेत, आपण आणि आपला पक्ष कसा श्रे÷ ठरलो हे सांगितले जाईल. 475 ग्रामपंचातीपैकी अधिकाधिक ठिकाणी आपला झेंडा कसा फडकला हे सांगताना केलेला राजकीय हिशोब मात्र पद्धतशीरपणे विसरला जाईल.









