गॅरंटी योजनांमुळे वेतन विलंबाने होत असल्याची प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑगस्ट महिना अर्धा उलटला तरी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रत्येक महिन्याला पाच तारखेपर्यंत वेतन केले जात असे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वेळेत वेतन मिळत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनाकडे डोळे लागून आहेत.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मोफत वीज, मोफत बसप्रवास, अन्नभाग्य योजनेतील पाच किलो तांदळाच्या बदल्यात पैसे या गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या आहेत. यासह गृहलक्ष्मी योजना जारी करण्यासाठी सरकारची तयारी सुरू आहे. त्यामुळे योजनांच्या पूर्ततेसाठी सरकारला कसरत करावी लागत आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देणेही आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वेतन वेळेत मिळत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पाच तारखेपर्यंत वेतन दिले जात असे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा करण्यात येत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून यामध्ये विलंब होत असल्याने गॅरंटी योजनांचा फटका आपल्याला सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटला तरी वेतन मिळाले नसल्याने सरकारी बाबूंचे लक्ष वेतनाकडे लागून आहे.