वृत्तसंस्था/ अलमाटी
येथे सुरू असलेल्या युडब्ल्यूडब्ल्यू मानांकन सिरीजमधील बोलेत तुर्लीखानोव्ह चषक महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल तसेच विश्व आणि आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेतील कांस्यविजेत्या सरिता मोरने 2022 च्या कुस्ती हंगामात पहिले सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताच्या मनीषाने 65 किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले.
शनिवारी या स्पर्धेत 59 किलो वजनगटात सरिता मोरने आपल्या तिन्ही लढती जिंकून सुवर्णपदक हस्तगत केले. या वजन गटातील अंतिम लढतीत सरिता मोरने अझरबैजानची झाला अलीयेव्हाचा तांत्रिक सरसतेवर पराभव केला. गेल्यावर्षी सरिताने महिलांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत पहिले पदक मिळविले होते.
महिलांच्या 65 किलो वजनगटात भारताची मल्ल मनीषाने अंतिम लढतीत अझरबैजानच्या इलीस मनोलोव्हाचा 8-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वरिष्ठ गटातील मनीषाचे हे पहिले सुवर्णपदक आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत मनीषाने कांस्यपदक मिळविले होते. अलमाटीमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या बिपाशाने 72 किलो वजनगटात रौप्य, तर 55 किलो वजनगटात भारताच्या सुषमा शौकिनने कांस्य आणि पुरूषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात मोहितने 125 किलो वजनगटात कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 10 पदके मिळविली आहेत. महिलांच्या विभागात मानसी, साक्षी मलिक, दिव्या काकरन यांनी आपल्या वजनगटात सुवर्णपदके तर पूजा सिहागने कांस्यपदक त्याचप्रमाणे पुरूषांच्या ग्रीकोरोमन पद्धतीत भारताच्या निरजने 63 किलो वजनगटात कांस्यपदक घेतले आहे.









