वृत्तसंस्था/ कराची
भारतातील विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ मायदेशी परतल्यावर बाबर आझमच्या जागी कर्णधार बनू शकणारे संभाव्य उमेदवार म्हणून सर्फराज अहमद, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या नावांची चर्चा आहे. पाक संघ विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. संघाच्या दृष्टीने येत्या वर्षी होणारा ‘टी20’ विश्वचषक आणि ‘2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ या स्पर्धांसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे.
बाबरला स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळाली आणि कर्णधार म्हणून तो अयशस्वी ठरला आहे यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळात आता स्पष्ट एकमत होऊ लागले आहे. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतील आणखी चार साखळी फेरीतील सामने शिल्लक आहेत. त्यांनी सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धचा जो सामना गमावला त्यासह मागील तीन सामने ते हरले आहेत. तरीही ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात.
जर पाकिस्तानने चमत्कार घडवून आणला आणि विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात यशस्वी होताना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तरच बाबरला कर्णधार म्हणून टिकून राहण्याची संधी मिळू शकते. तशाही स्थितीत त्याच्याकडे फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकत, असे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे सर्फराज, शाहीन, रिझवान आणि शान मसूद यांच्यासह संभाव्य उमेदवारांच्या लॉबींनी त्यांच्या उमेदवाराची कर्णधार म्हणून निवड व्हावी यासाठी काम सुरू केले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ आता कसोटी व एकदिवसीय संघांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याची शक्यता आहे.









