प्रशिक्षक, नवोदित ड्रॅगफ्लिकर्स, डिफेंडर्स तयार करण्याचे हॉकी इंडियाचे लक्ष्य
वृत्तसंस्था /चेन्नई
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी माजी हॉकीपटू सरदार सिंग व रानी रामपाल यांची उपकनिष्ठ मुलांच्या व उपकनिष्ठ मुलींच्या संघांच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचे गुरुवारी जाहीर केले. कार्यकारी मंडळाच्या शंभराव्या बैठकीत हॉकी इंडियाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. ‘हॉकी इंडियातर्फे प्रथमच उपकनिष्ठ हॉकी संघ आम्ही तयार करणार आहोत. त्यामुळे लहान वयापासूनच त्यांच्या तयारीवर लक्ष पुरविता येणार आहे. उपकनिष्ठ मुलांसाठी सरदार सिंग मुख्य प्रशिक्षक असतील तर मुलींसाठी रानी रामपाल त्यांची प्रमुख प्रशिक्षक असेल,’ असे तिर्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशातील हॉकीची वाढ व विकास करण्याच्या निर्धाराचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. या शंभराव्या ऐतिहासिक बैठकीच्या अध्यक्षपदी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की होते. त्यांच्यासमवेत हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग, हॉकी इंडियाचे खजिनदार सेकर जे. मनोहरनही उपस्थित होते. यावेळी देशातील हॉकीच्या भविष्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कमी वयातच ड्रॅगफ्लिकर्सचा शोध घेऊन त्यांना तयार करण्यासाठी हॉकी इंडियातर्फे वार्षिक कार्यक्रम सुरू करण्याची योजना असल्याचे तिर्की म्हणाले. ‘हॉकी इंडियात सामील झाल्यापासून मूलभूत प्रोग्रामला बळकटी देण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. हॉकीमध्ये ड्रॅगफ्लिकर व डिफेंडर्स फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे नवोदित ड्रॅगफ्लिकर्स तयार करण्यावर आमचा भर असेल. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी ड्रॅगफ्लिकर्सचा उपयोग करून घेण्याचा विचार आहे,’ असेही ते म्हणाले. ‘यासाठी तीन वर्षाचा कार्यक्रम आखला असून त्यात प्रथम 45 दिवसांचे शिबिर घेतले जाईल, ज्यात रानी रामपाल व सरदार सिंग त्यांना मार्गदर्शन करून तयार करतील. आपले युवा संघ नेदरलँड्स व बेल्जियमला पाठवण्याचा विचार असून त्यासंदर्भात त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. सरदार सिंग हे प्रशिक्षकाबरोबरच निवड सदस्य म्हणूनही काम पाहतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग म्हणाले की, ‘शिबिरामध्ये वरिष्ठ खेळाडूंना ज्या सुविधा पुरविल्या जातात, तशाच सुविधा उपकनिष्ठ खेळाडूंनाही मिळाव्यात म्हणून ओडिशातील राऊरकेला स्टेडियमवर शिबिराचे आयोजन केले जाईल. राऊरकेला हे जगातील सर्वोत्तम हॉकी स्टेडियम असून उपकनिष्ठांचे पहिले प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. यासाठी आम्ही ओडिशा सरकारचे आभारी आहोत,’ असेही ते म्हणाले. उपकनिष्ठ मुलांच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल सरदार सिंग यांनीही हॉकी इंडियाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याआधी आमचे फक्त वरिष्ठ व कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंकडे जास्त लक्ष होते. पण अगदी कमी वयातील खेळाडूंना लवकर मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून त्यावर आता पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार असल्याचे सरदार सिंग म्हणाले. मुलींच्या संघांची मुख्य प्रशिक्षक रानी रामपालनेही सरदार सिंग यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. आपला अनुभव व कौशल्य नवोदितांना देण्यासाठी मी उत्सुक झाले आहे, असे रामपाल म्हणाली.









