सध्या शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत असून आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात आपल्याकडे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी रुपातल्या मातृदेवीची पूजा मोठ्या आत्मियतेने आणि भावभक्तीने चालू आहे. भाद्रपदात गणेश चतुर्थीनंतर येणारे शक्तीरुपिणी देवीचे नवरात्र विविध विधी, परंपरा आणि उत्सवांनी साजरे केले जाते, ते सृष्टीच्या मुळारंभाचे कारण असणाऱ्या मातृदेवतेच्या विविध स्वरुपांचे पूजन करूनच. गोवा-कोकणातच नव्हे तर घाटमाथ्यावरच्या प्रदेशात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मातारुपिणी देवी तत्त्वाला सुजलाम् आणि सुफलाम्तेच्या प्राप्तीसाठी आवाहन केले जाते. रिपुसंहारक महिषासूर मर्दिनी आणि धनदौलत, समृद्धीची देवी महालक्ष्मी यांच्या पूजनाबरोबर नवरात्रात महासरस्वतीच्या पूजनाला महत्त्व दिलेले आहे. वाणी, बुद्धी, ज्ञान, विद्या यांची आपणाला प्राप्ती व्हावी म्हणून देवी सरस्वतीची पूजा केली जाते. शौर्य, संपत्ती यांची प्राप्ती झाल्याने मानवी जीवनात सुख, समृद्धी आली तरी ज्ञान, विद्या साध्य झाल्याने जी परिपूर्णता लाभते, याची आपल्या भारतीय संस्कृती आणि लोकधर्माला जाणीव होती, यासाठी ज्ञान, विद्येची देवता म्हणून सरस्वतीच्या पूजनाला महत्त्व लाभलेले आहे.
आश्विन नवरात्रात शेवटच्या तीन दिवसांत सरस्वती पूजन केले जाते. सप्तमी ते नवमी हे तीन दिवस सरस्वती पूजनाशी संबंधित असून, विजयादशमीतल्या श्रवण नक्षत्रावरती तिच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. आश्विन नवरात्राशिवाय सरस्वतीची पूजा कार्तिक शुक्ल पंचमी आणि माघ शुक्ल पंचमीलाही करण्याची परंपरा काही राज्यांत प्रचलित आहे. सरस्वती जरी आज ज्ञानाची देवी म्हणून वंदनीय ठरलेली असली तरी ऋग्वेदात तिला नदीचे मानवी रुप मानलेले आहे. परंतु कालांतराने नदीचे मानवी रुप असलेली ही देवी वाणीची स्फूर्तीदेवता, साहित्य आणि विज्ञान यांची अधिष्ठात्री देवता म्हणून भारतीय उपखंडात पूजली गेली. गंधर्व आणि देवांनी वाग्देवी रुपातल्या सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी संगीत व तंतूवाद्याचा समन्वय घातला. त्यामुळे ज्ञान, विद्या, वाणी यांच्याबरोबर तिला ललित कला आणि चौसष्ट कलांची देवता मानलेली आहे. नदी देवता, वाग्विलासिनी आणि विद्यादेवता म्हणून सरस्वतीला पूजनीय मानलेले आहे. जैन दर्शनात सरस्वती श्रुतीदेवी तर बौद्धांनी तिची पूजा प्रज्ञापारमिता म्हणून केल्याचे संदर्भ आढळतात. बौद्ध वाङ्मयात तिचा उल्लेख महासरस्वती, वज्रवीणा अशा विविध नावांनी केलेला आहे. द्विभूज सरस्वतीपासून सोळा हातांनी युक्त देवता मूर्ती स्वरुपात पूजली जाते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सरस्वतीच्या मूर्ती भारहूत, मथुरा आदी ठिकाणी आढळलेल्या होत्या. मोर ही तिची विशेष लोकप्रिय वाहने मूर्तिशिल्पात कोरलेली असली तरी सिंह, मेंढासारखे प्राणी तिच्या आसनासाठी वापरलेले पाहायला मिळाले आहेत. असे असले तरी वीणा, पुस्तक धारण केलेली आणि पूर्ण कमलपुष्पावरती विराजमान झालेली सरस्वतीची चित्रे आणि मूर्तिशिल्पे प्रामुख्याने विविध ठिकाणी आढळतात. सरस्वती ही मानवी देह रुपात पूजली जात असली तरी तिला प्रारंभीच्या काळात नदी मानत होते आणि कलांतराने नदीचे मानवी रुप म्हणून तिला पूजले जाऊ लागले. भारतात सरस्वती नावाने ओळखल्या जाणाऱ्या जवळपास 32 नद्या असून, तिचा उगम कुठे आणि कसा झाला, हे संशोधकांसाठी कोडे ठरलेले आहे. काही संशोधकांच्या मते सरस्वती नदीचा उगम हरयाणातल्या अंबाला जिल्ह्यातल्या सिरमूर व शिवालिक पर्वतरांगांत होऊन, ती भवानीपूर व बालछप्परनंतर वळसा घेऊन लोप पावते आणि त्यानंतर कर्नालच्या बरखेडेत प्रकट होते. येथे तिला घग्गर मिळते आणि पुढे ती हाकारा किंवा सोतार म्हणून ओळखली जाते. पुढे हनुमानगडजवळ वाळवंटात गुप्त होते. काही तज्ञांच्या मते सरस्वती राजस्थानातल्या पूर्वाश्रमीत जंगल प्रदेशातून वाहणारी महत्त्वपूर्ण नदी असली पाहिजे परंतु असे असले तरी भारतीय संस्कृतीने या जीवनदायिनीला देवी रुपात पूजलेले असून ऋग्वेदात तिचा उल्लेख ‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती’ असा केलेला आहे. सर्वश्रेष्ठ माता, सर्वश्रेष्ठ नद्या, सर्वश्रेष्ठ देवी सरस्वती असा केलेला आहे.
सरस्वती अंबिका, भारती, चंद्रिका, गोमती, सौदामिनी, सुभद्रा, विद्या, श्वेतांबरा आदी नावांनीसुद्धा ओळखली जाते. विद्यासंपन्न लोकांच्या जिभेवरती नाचणारी, नदीच्या रुपात पृथ्वीवर नांदणारी देवी म्हणून सरस्वतीचा उल्लेख केला जातो. सरस्वतीच्या देवी रुपातल्या प्रतिमा केवळ भारतातच आढळत नसून अन्य देशांतही ती वंदनीय ठरलेली आहे. इंडोनेशियात विद्येची देवी म्हणून पूजली जाते तर बाली द्विपावरती ज्ञान, सर्जनशील कला, शिक्षण, शुद्धता यांची देवता मानली जाते. चीनमध्ये वक्तृत्ववान देवी, अद्भूत ध्वनीची देवी म्हणून चीनी बौद्ध मठात तिला स्थान प्राप्त झालेले आहे. जपानी संस्कृतीत सरस्वतीची संकल्पना रुढ असून, कंबोडियात वक्तृत्व, लेखन आणि संगीताची देवता म्हणून तिला स्थान दिलेले आहे. थायलंडमध्ये वाणी आणि विद्येची तर म्यानमारमध्ये महायान बौद्ध पंथात परीक्षेपूर्वी यशप्राप्तीसाठी तिची प्रार्थना केली जाते. तिबेटीयन संस्कृतीने तिला संगीताची देवी म्हणून स्थान दिलेले आहे. विज्ञान, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञानाशी सरस्वतीला देवी मानलेले आहे.
सरस्वती देवी म्हणून केवळ हिंदू, जैन, बौद्ध परंपरेत पूजनीय मानलेली नसून, विजापूर सुलतानपदी विराजमान झालेल्या इब्राहिम आदिलशहा द्वितीय याने आपल्या ‘किताब-इ-नवरस’ ग्रंथात ‘तुर्क (मुस्लिम) असो अथवा ब्राह्मण, विभिन्न भाषांत-संवेदना समान, हे माते सरस्वती। तू इब्राहिमला आशीर्वाद दिल्याने, त्याची नवरस कृती होईल चिरंतर’ असा उल्लेख केलेला आहे. नऊ रसांचा परिचय करून देण्यासाठी इब्राहिम आदिलशहा द्वितीय याने या ग्रंथाची निर्मिती केली होती. जगद्गुरु बादशहा म्हणून परिचित असलेल्या या विजापूरच्या सुलतानाला संगीत आणि संगीत वाद्यांविषयी विलक्षण प्रेम होते. त्याने आपल्या कारकिर्दीत संगीत विद्याध्ययनाला प्राधान्य देण्यासाठी नवरसपूर शहराची संकल्पना मूर्त स्वरुपात आणून तेथे मंदिराचे बांधकाम केले होते. कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातल्या कामाठागीतील गिरीमठ येथील हिंदू-मुस्लिम एकोप्याचे प्रतिक असणारी मंदिर-मस्जिद एकत्र नांदणारी वास्तु इब्राहिम आदिलशहा द्वितीयच्या काळात उभी झाली, असे मानले जाते. आपला पिता गणपती आणि देवी सरस्वतीला माता मानणाऱ्या या सुलतानाने ‘किताब-इ-नवरस’ ग्रंथाप्रमाणे फर्मानातही देवी सरस्वतीला अभिवादन केले होते.
विद्या, ललित कला, ज्ञानोपासना आदीशी संबंधित असलेली देवी सरस्वतीची उपासना प्राचीन काळापासून देशभरात प्रचलित होती आणि त्यासाठी काश्मिरपासून तामिळनाडूपर्यंत तिची मंदिरे पाहायला मिळतात. पाकव्याप्त काश्मिरातील प्राचीन शारदा पीठ, तेलंगणा राज्यातील गोदावरी काठावरचे बसर येथील ज्ञान सरस्वती मंदिर, मेडक येथील वारगल सरस्वती, कर्नाटकातील शृंगेरी येथील शारदंबा, तामिळनाडूतील कूथानूर सरस्वती अशी सरस्वतीची मंदिरे भाविकांत विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. ज्ञानोपासना, विद्याभ्यास, संगीत साधना यांच्याशी संबंधित असणारी वीणा, पुस्तकधारिणी, हंसवाहिनी, मयुरावरती विराजमान झालेली सरस्वती देवी भारतीय धर्म आणि संस्कृतीत वंदनीय ठरलेली असून, आश्विन नवरात्रात गोवा-कोकणात तिचे पूजन मृण्मयी मूर्ती किंवा चित्र स्वरुपात मोठ्या उत्साहात केले जाते.
सरस्वतीची पूजन परंपरा विद्याभ्यास, संगीत साधना, ज्ञानोपासनेशी संबंधित असून, त्याद्वारे आपल्या पूर्वजांनी या देवीला महत्त्वाचे स्थान दिले होते. सत्य, शुचिता, पांडित्य आदींची प्राप्ती व्हावी म्हणून सरस्वतीला प्रतिक मानून तिची उपासना लोकमानसाने आरंभली होती आणि त्यामुळे आज गंगेसारखे सरस्वती नदीचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत नसले तरी भारतीय संस्कृतीची अधिष्ठात्री म्हणून तिला विशेष स्थान दिलेले आहे.
– राजेंद्र पां. केरकर








