हणजूण पोलिसस्थानकात तक्रार नोंद
प्रतिनिधी /म्हापसा
वाराणशीहून पर्यटनासाठी गोव्यात दाखल झालेल्या सारा खान नामक महिलेने अमलीपदार्थाचा ओव्हर डोस घेतल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध तसेच तिला अमलीपदार्थाचा पुरवठा करणाऱया ड्रग्स पॅडलरविरुद्ध गुन्हा नोंद करुन घेतला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.
त्या महिलेने अमलीपदार्थचा ओव्हर डोस घेतल्याने ती हणजूण येथे पार्टीत अत्यवस्थ झाली. तिला उलटय़ा होऊ लागल्याने रात्रीच तातडीने कळंगूट आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पणजी जवळच्या खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉक्टरसमवेत आली गोव्यात
सारा खान असे त्या महिलेचे नाव असून तिची प्रकृती आता हळूहळू सुधारू लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कळंगूट पोलीस सध्या त्यांच्यासमवेत गोव्यात आलेल्या वाराणाशीतील डॉक्टरांची कसून चौकशी करत आहेत. ही महिला व तिच्यासोबत असलेला अन्य एक डॉक्टर 19 नोव्हेंबर रोजी हणजूण येथील नामांकित हॉटेलात उतरले होते.
हणजूण येथील या नामांकित हॉटेलच्या बाजूलाच राज्यातील एका पोलीस अधिकाऱयाची पार्टी चालली होती. या पार्टीला राज्यातील पोलीस निरीक्षक तसेच काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्या हॉटेलात ही घटना घडली त्या हॉटेलातही रात्री उशिरापर्यंत पार्टी अधिकारीवर्गाच्या डोळय़ांसमोर सुरू होती.









