महिला एकेरीत साबालेन्का, जेसिका पेगुला अंतिम फेरीत, मुचोव्हा, नेव्हारो स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
इटलीच्या सारा इराणी व आंद्रेयास वावासोरी यांनी येथे सुरू असलेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. महिला एकेरीत अमेरिकेची जेसिका पेगुला व बेलारुसची आर्यना साबालेन्का यांनी अंतिम फेरी गाठली तर झेकची कॅरोलिना मुचोव्हा व अमेरिकेची एम्मा नेव्हारो यांचे आव्हान संपुष्टात आले.
सारा इराणी व वावासोरी यांनी अंतिम लढतीत बिगरमानांकित अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड व डोनाल्ड यंग यांच्यावर चुरशीच्या लढतीत 7-6, 7-5 अशी मात केली. सारा इराणीने यापूर्वी महिला दुहेरीत पाच ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. वावासोरी व इराणी यांनी एकत्र खेळताना मिळविलेले हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. एकत्र खेळण्याची त्यांची ही तिसरी मोठी स्पर्धा आहे. याआधी विम्बल्डन व पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते एकत्र खेळले होते. टाऊनसेन्ड व यंग यांची ही एकत्र खेळण्याची शेवटची स्पर्धा होती. यंग निवृत्त होणार आहे तर टाऊनसेंड टेनिस सोडून आता पिकलबॉल खेळात सहभागी होणार आहे.
टाऊनसेंडने महिला दुहेरीतही चांगले प्रदर्शन केले होते. झेकच्या कॅटरिना सिनियाकोव्हासमवेत तिने उपांत्य फेरी गाठली होती. पण त्यांना झँग शुआई व क्रिस्टिना म्लाडेनोविच यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विम्बल्डनमध्ये मात्र या जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.
साबालेन्का, पेगुला जेतेपदासाठी लढणार
महिला एकेरीत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुलाने झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाचा एका सेटची पिछाडी भरून काढत 1-6, 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. गेल्या सोळांपैकी 15 सामने जिंकणाऱ्या पेगुलाची शनिवारी द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काशी जेतेपदाची लढत होईल. साबालेन्काने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून तिने अमेरिकेच्या तेराव्या मानांकित एम्मा नेव्हारोचा 6-3, 7-6 (7-2) असास पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. मागील वर्षीही तिने अंतिम फेरी गाठली होती. पण कोको गॉफने तिला हरवून जेतेपद पटकावले होते. यावेळी जेतेपदाची स्वप्न साकारण्यास साबालेन्का सज्ज झाली आहे.









