सध्याचा रिमझिम पाऊस भातरोप लागवडीला वरदान ठरल्याचे मत
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये तीनवेळा मार्कंडेय नदीला आलेल्या पुराशी सामना करत शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणची भाताची रोपे जमा करून अखेर भातरोप लागवड अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उशिरा सुरू झालेल्या भातरोप लागवड मोठ्या शर्थीने, कसरत करत रोप लागवडीचा हंगाम यावर्षी पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सदर पाऊस हा भातरोप लागवडीला वरदान ठरला असल्याचे मत शेतकरी वर्गातून वर्तविले जात आहे.
दरवर्षी शेतकऱ्याला शेतीची पिके घेण्यासाठी निसर्गाच्या कचाट्यात सातत्याने अडकावे लागते. यातून काबाडकष्ट करत करत अखेर उत्पादन काढावे लागते. ही नित्याचीच बाब आहे. चालूवर्षीचा हंगाम पाहता मुसळधार वृष्टीमुळे पश्चिम भागात वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये पुराचे पाणी शिरून भाताची केलेली रोप लागवड तीनवेळा खराब झाली. मात्र शेती व्यवसाय हा केलाच पाहिजेत. यावरतीच त्यांची उपजीविका चालते. यासाठी शेतकरी मागे न हटता कुठून मिळेल तेथून भाताची रोपे मिळवून अखेर चौथ्यांदा रोप लागवड करून या निसर्गाशी सामना करत त्याने यामध्येही पुढचे पाऊल टाकल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
चिखल करण्यासाठी अनेक उपाय
अनेक शेतकऱ्यांना भाताच्या बियाणांची पेरणी केली होती. भाताची रोपे उगवली, पण मुसळधार पावसाने ती खराब झाली. पुन्हा पेरली पुन्हा भाताची बियाणे कुजून गेली, अशा कसरती करून शेतकऱ्यांना भाताची रोपे मिळालीच नसल्याने त्यांनी जिथे मिळेल तेथून सहाशे ते आठशे रुपये मोजून अखेर त्याची लागवड केली आहे. चालूवर्षीचा भात लागवडीसाठीचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्राथमिक दर्शनी पोषक नसल्याने प्रत्येक पिकाला धोक्याचेच सावट जाणऊ लागले होते. गेल्या आठवडाभरात पावसाची रिमझिम सुरू झाल्याने ज्या पाणथळ जमिनीत पाणी साचू लागले. अशा जमिनीमध्ये चिखल करून भातरोप लागवडीला प्रारंभ करण्यात येऊन तो आता पूर्णत्वाला गेला आहे. शेतवडीत पाणी आणि चिखल करण्यासाठी पॉवर ट्रिल्लर, ट्रॅक्टर याबरोबरच बैलजोडीने नांगरट करून चिखल करून भातरोप लागवड आता अंतिम टप्प्यात पोहचल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ
पश्चिम भागामध्ये अलीकडच्या काळात ऊस उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, भात पिकाकडे अधिक लक्ष दिल्याचेही दिसून येत आहे. कारण या भागातील साखर कारखाने ऊस पिकाची वेळेत उचल करत नसल्याने भाताचे पीकच आता परवडत असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच भाताच्या पिकानंतर इतर भाजीपाला काढण्यासाठी या शेतीचा उपयोग केला जातो. म्हणून शेतकरी भात पिकाच्या उत्पादनाकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.









