छायाचित्रे झाली व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने अलिकडेच सुनिधी चौहानचा म्युझिक व्हिडिओ ‘आंख’मध्ये स्वत:च्या नृत्य कौशल्याद्वारे प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सितारवादक ऋषभ रिखीराम शर्मासोबतच्या स्वत:च्या छायाचित्रांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऋषभ हा सितारवादक अन् संगीतकार आहे. तो कुशल ल्युथियर्स निर्माण करणाऱ्या परिवाराचा सदस्य आहे. या परिवाराने प्रख्यात सितारवादकांसाठी वाद्यं तयार केली आहेत. ऋषभ हा दिवंगत सितारवादक पंडित रविशंकर यांचा शिष्य आहे.
ऋषभ सोशल मीडियावर स्वत:च्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. तो विदेशातही कार्यक्रम आयोजित करत असतो. 2022 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित दिवाळी पार्टीसाठी त्याला आमंत्रित करण्यात आले होते. तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यातही त्याने भारतीय अॅथलिट्ससाठी परफॉर्म पेले होते. सान्या लवकरच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. करण जौहरच्या या चित्रपटात वरुण धवन, जान्हवी कपूर आणि रोहित सराफ देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.









