वृत्तसंस्था/ कोलकाता
गेल्या वर्षी उपांत्य फेरीत स्थान मिळविलेल्या मेघालयला यावेळी संतोष करंडक स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळविता आले नसले तरी उत्तर-पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करणारे तीन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. गोवा व सेनादल संघांनी मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळविले. आहे.
गोवा व सेनादल या संघांनी सर्वप्रथम संतोष करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले असून सेनादलाने उपांत्यपूर्व फेरीत रेल्वेचा दोन गोलांनी पराभव केला. शफील पीपीने 9 व्या मिनिटाला स्पॉट किकवर पहिला गोल केला तर समिर मुरमूने पूर्वार्धातील जादा वेळेत दुसरा गोल नोंदवला. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात गोवा संघाने दिल्लीवर 2-1 अशा गोलफरकाने मात केली.
मंगळवारी मणिपूर व आसाम आणि मिझोरम व केरळ यांच्यात उपांत्यपूर्व लढती होणार आहेत. इटानगर येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर ही लढत होईल. चौथी उपांत्यपूर्व लढत सातवेळा राष्ट्रीय चॅम्पियन्स ठरलेले केरळ व मिझोरम यांच्यात सायंकाळी होईल.
आसाम पहिले जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या मणिपूरशी त्यांचा मुकाबला होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक दहा गोल नोंदवणारा सनाथोई मीतेई मणिपूर संघात आहे. त्यांच्या शानदार कामगिरुमुळेच मणिपूरला इथवर मजल मारता आली आहे. मागील वर्षी केरळला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्याची भरपाई यावेळी मिझोरमला हरवून करण्यासाठी ते उत्सुक आहेत. मिझोरमला मात्र त्यांना हरविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.









