2021-22 मध्ये विप्रोचा व्यवसाय 8,634 कोटी रुपयांवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विप्रो कंझ्युमर पेअर ऍण्ड लायटिंग(डब्लूसीसीएल) यांचा साबण ‘संतूर’ मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2,300 कोटी रुपयांचा लोकप्रिय ब्रँड बनला आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनीत अग्रवाल यांनी दिली आहे.
दररोजच्या वापरातील साहित्य आणि लायटिंग उत्पादनामध्ये व्यवसाय करणारी कंपनीची उलाढाल ही 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात 8,634 कोटी रुपयांची झाली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये कंपनी चलनवाढीच्या दबावामुळे चिंतेत आहे, परंतु पाम तेलाच्या किमतीमध्ये नरमाई आल्याने व कच्च्या तेलाचे भाव खाली आल्याने व्यवसायात सुधारणात्मक स्थिती निर्माण झाली असून त्याचा फायदा कंपनीला होतो आहे.
कंपनीची मजबूत कामगिरी
भारतामध्ये संतूरची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. यामुळेच आमच्या ब्रँडने 2,300 कोटीचा टप्पा प्राप्त केला आहे. साबणाच्या ब्रँडमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये संतूर पहिल्या नंबरचा ब्रँड बनला आहे.









