वनडे व टी-20 संघांची पूर्ण वेळ जबाबदारी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
डावखुरा स्पिनर मिचेल सँटनरची बुधवारी न्यूझीलंड संघाचा मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. गेल्या जूनमध्ये टी-20 वर्ल्ड कप झाल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने नेतृत्व सोडले होते. सँटनर आता हे पद पूर्ण वेळ सांभाळणार आहे.
243 आंतरराष्ट्रीय सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारा सँटनर आता वनडे व टी-20 या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी त्याने 24 टी-20 व 4 वनडेत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. 32 वर्षीय सँटनर या महिन्याच्या अखेरीस लंकेविरुद्ध होणारा टी-20 व वनडे मालिकेपासून ही जबाबदारी स्वीकारणार आहे. या मालिकेने न्यूझीलंडच्या व्हाईटबॉल क्रिकेटच्या भरगच्च कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. फेब्रुवारीत पाकमध्ये तिरंगी वनडे मालिका, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, मायदेशात पाकविरुद्ध टी-20 व वनडे मालिका त्यांच्या होणार आहेत. डिसेंबर 28 रोजी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बे ओव्हल येथे सुरुवात होणार आहे.









