दीड वर्षापासून बंद : नागरिक घेताहेत खासगी दवाखान्याचा आधार
वार्ताहर/किणये
सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने सरकारने आरोग्य केंद्रे निर्माण केली आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये गोरगरीब व होतकरू लोकांना मोफत उपचार व औषधे दिली जातात. याचा काही गावांना फायदाही होतो आणि लोक या ठिकाणी उपचारही करून घेतात. मात्र संतिबस्तवाड येथील उपआरोग्य केंद्र सध्या बंद आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राकडे लक्ष देणार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. व्हीटीयू जवळच्या संतिबस्तवाड येथील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. या गावातील अप आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे खराब झाली असून त्या इमारतीला गळती लागली आहे. दरवाजे मोडलेल्या अवस्थेत आहेत .गेल्या दीड वर्षापासून हे आरोग्य केंद्रच बंद आहे. त्यामुळे या गावातील उप आरोग्य केंद्र आजारी पडले आहे काय? अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उपस्थित होऊ लागल्या आहेत.
पावसाळ्यात केंद्राला गळती
गावात सुमारे 6500 लोकवस्ती आहे. ग्रामपंचायतीच्या जवळच उपआरोग्य केंद्राची इमारत आहे. मात्र या केंद्रातून नागरिकांना आरोग्य संबंधित सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सर्वजण वैतागून गेले आहे. पावसाळ्यात या उपआरोग्य केंद्राला पूर्णपणे गळती लागलेली होती. शौचालयही व्यवस्थित नाही. फरशीच्या ठिकाणी घुषी व उंदीर लागलेले आहेत. या आरोग्य केंद्राची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच हे उप आरोग्य केंद्र दीड वर्षापासून बंद आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
रुग्णांची तपासणी खोलीवरच
आरोग्य केंद्रातील आरोग्याधिकारी व नर्स यांनी गावात एक खासगी खोली घेतलेली आहे. त्या ठिकाणी सध्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र नागरिकांना तेथे जाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. 24 तास सेवा देणारे आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी आजारी व्यक्तीला थेट बेळगाव व इतर खासगी दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते असेही नागरिक सांगू लागले आहेत.
खासगी इमारतीत सेवा
गावातील उपआरोग्य केंद्र सध्या बंद आहे. नर्स व डॉक्टर गावातील खासगी इमारतीत सेवा देत आहेत. रात्री एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना थेट बेळगावला किंवा खासगी दवाखान्याला घेऊन जावे लागत आहेत. त्यामुळे गावातील उपआरोग्य केंद्र बंद आहे. याकडे सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.
– भरम गुडुमकेरी, संतिबस्तवाड









