वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक सँटीयागो निएव्हा यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. गेली पाच वर्षे निएव्हा यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, अशी माहिती अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
2017 साली सँटीयागो निएव्हा यांची भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाच्या हाय परफॉर्मन्स संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाची कामगिरी बरीच उंचावली. निएव्हा आता ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सुत्रे स्वीकारणार आहेत. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तसेच 2019 साली झालेल्या पुरूषांच्या विश्व़ मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताने दोन पदके मिळविली होती. निएव्हा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध क्षेत्राचा दर्जा गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत निश्चितच सुधारला. अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी निएव्हा यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









